आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

अल्पवयीन मुलीची बाधा दूर करण्यासाठी अघोरी पूजा

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • September 28, 2021
Spread the love

भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा : स्थानिकांनी हटकल्यानंतर मांत्रिकासह सर्व पळाले

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : अल्पवयीन मुलीची बाधा दूर करण्यासाठी म्हणून सुरूरच्या स्मशानभूमीत एक मांत्रिक अघोरी पूजा करताना आढळला. दरम्यान, स्थानिकांनी मांत्रिक व मुलीसोबत आलेल्यांना हटकल्यावर त्यांनी स्मशानभूमीतून पळ काढला. याबाबत भुईंज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

दरम्यान, विवेक वामन चव्हाण (वय 30, रा. सुरूर) यांनी याबाबतची भुईंज पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सुरूर (ता. वाई) गाव धावजी पाटील मंदिरामुळे प्रसिद्ध आहे. मांढरदेवीच्या काळूबाईला भेटायला येणारे भक्त दावजी पाटील मंदिराला नेहमीच भेट देत असतात. या मंदिरातसुद्धा काही तांत्रिक, मांत्रिक गोष्टी घडत असल्याचे प्रशासनाच्या लक्षात आल्याने येथील पुजाऱ्यांवर कारवाई करण्यात आली होती. तेव्हापासून या मंदिर परिसरातील बाहेरून येणाऱ्या पुजाऱ्यांचे तंत्रमंत्र प्रकार पोलीस हस्तक्षेपाने बंद झाले होते. या मंदिरापासून काही अंतरावरच सुरूर येथील स्मशानभूमी आहे.

या स्मशानभूमीत मात्र अघोरी प्रकार घडल्याने सुरुरकर ग्रामस्थांच्या काळजाचा ठोका चुकला. सुरूरकर येथील स्मशानभूमीत एका लाल शर्ट घातलेल्या तांत्रिकाने एका अल्पवयीन युवतीला ‘बाहेरचे लागीर झाले आहे,’ असे सांगून स्मशानभूमीत हळदीकुंकवाचे गोलाकार रिंगण आखून त्याशेजारी अंडे, नारळ, लिंबू, काळी बाहुली ठेवून अल्पवयीन मुलीस केस मोकळे सोडून बसविल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. ग्रामस्थांनी याबाबत या मुलीसोबत आलेल्या महिला व पुरुषांना हटकले असता’ आमच्या मुलीस बाहेरची बाधा झाली असून ती काढण्यासाठी व कोंबडा देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो आहोत,’ असे यावेळी सांगण्यात आले. या मुलीसोबत असलेल्या महिलांनी गोंधळ करावयाला सुरुवात केल्याने सुरूर ग्रामस्थांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

मात्र, याठिकाणी ग्रामस्थ मोठ्या संख्येने जमा झाल्यावर आम्ही पुण्याहून आलो आहोत एवढीच जुजबी माहिती देऊन या लोकांनी स्मशानभूमीतून पळ काढला. दरम्यान, विवेक चव्हाण (वय 30, रा. सुरूर) यांनी याबाबतची भुईंज पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुरुर गावच्या हद्दीत सार्वजनिक स्मशानभूमीमध्ये अनोळखी तीन पुरुष व तीन महिलांनी त्यांच्यासोबत असणाऱ्या सुमारे 12 ते 15 वर्षे वयाच्या मुलीस झपाटल्याने तिला कुंकवाच्या वर्तुळामध्ये मांडीवर कोंबडा घेऊन बसवले, समोर टाचण्या टोचून लिंबे व काळ्या बाहुल्या ठेवून त्यावर हळद कुंकू टाकून तसेच मुलीच्या अंगावर हळद कुंकू टाकून मंत्र पुटपुटून अमानुष, अनिष्ठ व अघोरी प्रथा जादुटोणा कृती करत असताना आढळल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे.