सोलापूर ग्रामीण एल.सी.बी.ची धडाकेबाज कामगिरी : एकूण आठ लाखांचा मुद्देमाल जप्त
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
सोलापूर : वडाळा येथील डॉक्टरांना खंडणीच्या उद्देषाने अपहरण करून लुटलेल्या सात आंतरजिल्हा दरोडेखोरांच्या चार दिवसांत मुसक्या आवळण्यात सोलापूर ग्रामीण एल.सी.बी.ला यश मिळाले असून, गुन्ह्यात वापरलेली इनोव्हा कार, मोटार सायकल व सात मोबाईल असा एकूण आठ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दिनांक 21 सप्टेंबर रोजी रात्री साठेआठच्या सुमारास फिर्यादी डॉ. अनिल व्यंकटेश कुलकर्णी (वय 47, व्यवसाय- वैद्यकीय सेवा व इंडियन ऑईल पेट्रोल पंप, रा.वडाळा ता. उत्तर सोलापूर, सध्या रा. उत्तर कसबा सोलापूर) हे त्यांच्या वेरना गाडीमधून मौजे वडाळा ते सोलापूरकडे जात असताना बीबी दारफळ ते कोंडी गावाचे रस्त्याच्या दरम्यान एम.आय.डी.सी.च्या जवळ असलेल्या क्रॉस रोडवर आल्यानंतर अज्ञात दरोडेखोरांनी त्यांच्या ताब्यातील इनोव्हा गाडी आडवी लावून फिर्यादी यांना गावठी बंदुकीचा धाक दाखवून कोयत्याने उजव्या हाताच्या दंडावर, काठी व हॉकी स्टीकने उजव्या पायावर मारहाण करून जखमी करून जिवे ठार मारण्याची धमकी देऊन जबरदस्तीने इनोव्हा गाडीत बसवून त्याचे अपहरण केले.
तसेच एक कोटीची खंडणीची मागणी करून त्यांना मोहोळ, पंढरपूर, टेंभुर्णी, इंदापूर, बारामती, जेजुरी, सासवड मार्गे वारजे-माळवाडी पुणे येथे नेऊन त्याच्याकडील पेट्रोल पंपाची जमा असलेली पाच लाख 70 हजार 420 रुपये रोख रक्कम तसेच फिर्यादी यांच्या खिशातील 18 हजार रुपये रोख रक्कम असा एकूण 5 लाख 88 हजार 420 रुपये जबरदस्तीने काढून घेऊन यातील फिर्यादीस वारजे मळेवाडी पुणे येथे ढकलून दिले. याबाबतच्याफिर्यादीवरून सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता.
सदर गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव, तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील आणि इतर पोलीस अधिकारी यांनी घटनास्थळी भेटी दिल्या. भेटी दरम्यान पोलीस अधीक्षक व अपर पोलीस अधीक्षक यांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याकामी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना मार्गदर्शन व सूचना दिल्या होत्या. त्यानुसार गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांनी सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे आणि त्यांचे पथक नेमून पथकास यातील फिर्यादीस वारजे माळवाडी पुणे येथे सोडले असून सदर गुन्ह्यात गावातील एखाद्या व्यक्तीचा सहभाग असण्याची दाट शक्यता असून त्या दृष्टिकोनातून तपास करून गावातील व पुणे भागातील अशा पद्धतीचे गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांची माहिती संकलित करून गुन्हा उघडकीस आणणेकामी सूचना दिल्या.
त्याप्रमाणे गुन्हे शाखेकडील सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे आणि त्यांचे पथक सदर गुन्ह्याचे तपासकामी पुणे शहरात असताना, बातमीदारामार्फत खात्रीशिर माहिती मिळाली की, सदरचा गुन्हा हा वडगाव, सिंहगड रोड, पानमळा पुणे येथील गुन्हेगारांनी केला आहे. सदर माहिती मिळाल्याने पाच आरोपीतांना पुण्यातून ताब्यात घेऊन त्यांच्याकडे स्वतंत्ररीत्या विचारपूस करता त्यांच्यापैकी एका आरोपीने सांगितले की, त्याचा मामाचा मुलगा हा मौजे वडाळा ता. उत्तर सोलापूर येथे राहवयास असून, त्यास मागील दोन ते तीन महिन्यांपूर्वी मोठी असामी असलेल्या व्यक्तीस लुटण्याचे काम बघण्यास सांगितले होते. त्याप्रमाणे मामाच्या मुलाने सांगितले की, मौजे वडाळा गावात एक डॉक्टर असून त्यांचा पेट्रोलपंप व दवाखाना आहे. त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात पैसे असून ते दरदोज पेट्रोल पंपातील व दवाखान्यातील जमा झालेली रक्कम त्यांचेकडील वेरना कारमधून सोलापूरला जात असतात. त्यांचे किडनॅपिंग केले तर ते आपल्याला एक-दोन कोटी रुपये नक्की देईल, अशी माहिती सांगितली होती.
तेव्हा मामाचे मुलास लुटण्याचे काम कधी करावयाचे आहे ते तू मला दोन-चार दिवस अगोदर सांग, असे आरोपीने सांगितले होते. त्याप्रमाणे वडाळा येथील आरोपीच्या मामाच्या मुलाने नियोजन करून पुण्यातील आरोपीतांना तीन दिवस अगोदर बोलावून घेतल्याने ते सर्वजण इनोव्हा गाडीने सोलापूर शहरात येऊन सोलापुरातील हॉटेल ॲम्बेसिडर येथे थांबले होते. दरम्यान, आरोपीच्या मामाचा मुलगा व त्याचा एक मित्र असे सदर लॉजमध्ये गुन्ह्याचे नियोजन करून दिनांक 21 सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास डॉक्टर यांना किडनॅपिंग करून लुटण्याचे ठरले.
दिनांक 21 सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास ठरल्याप्रमाणे मामाचे मुलाने डॉक्टर गावातून निघाले असून मी त्यांचे मागे मोटार सायकलवर असल्याचे सांगीतले. त्यानंतर आरोपींतांनी डॉक्टरची वेरना गाडीस इनोव्हा गाडीने अडवून डॉक्टरांना त्यांचे कारमधून बाहेर काढून इनोव्हा गाडीमध्ये घातले. तेव्हा इनोव्हामधील एका आरोपीने डॉक्टरांची वेरना गाडी ताब्यात घेऊन त्यानंतर आरोपींनी डॉक्टरांना घेऊन बीबी दारफळ, मोहोळ, पंढरपूर, टेंभूर्णी, इंदापूर, बारामती, जेजूरी, सासवड मार्गे वारजे- माळवाडी ब्रिज पुणे येथे नेऊन सोडल्याचे सांगून त्यासाठी मामाच्या मुलाने व त्याचे मित्राने मदत केल्याचे सांगून चोरलेले पैसे आपसात वाटून घेतल्याचे सांगितले.
न्यायालयाने अटक आरोपीताची गुन्ह्याचे तपासकामी चार दिवसांची पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केली असून सदर गुन्ह्याचा तपास सोलापुर तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक बंडगर हे करीत आहेत.
अटक आरोपींपैकी मुख्य आरोपीताविरुद्ध हवेली पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल असून इतर दोन आरोपितांविरुद्ध हवेली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
सदर गुन्ह्यातील आरोपितांकडून चोरलेल्या रोख रकमेपैकी अडीच लाख रोख रक्कम हस्तगत केली असून, गुन्ह्यात वापरलेली इनोव्हा कार आणि हिरो कंपनीची एचएफ डिलक्स मोटार सायकल व आरोपीतांचे एकूण सात मोबाईल असा एकूण 8 लाख 13 हजार 500 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी ही, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे, पोलीस अंमलदार नारायण गोलेकर, धनाजी गाडे, मोहन मनसावाले, अक्षय दळवी, चालक समीर शेख यांनी बजावली आहे.