सतर्कतेचे आवाहन : पंचतारांकित हॉटेल्समध्ये कारवाईची भीती दाखवत खंडणी उकळण्याचा प्रकार
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : कॉपीराईट कंपन्याकडून विवाह सोहळा आयोजकांची आर्थिक पिळवणूक होत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. पंचतारांकित हॉटेल्समध्ये कारवाईची भीती दाखवत खंडणी उकळण्याच्या तक्रारी झाल्यानंतर अशी फी बेकायदा असून, त्याबाबत सतर्क राहण्याचे आवाहन पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी केले आहे.
पुणे शहरात विविध पंचतारांकीत हॉटेल्समध्ये आर्थिकदृष्ट्या सघन कुटुंबांचे विवाह समारंभ साजरे होत असतात. अशा विवाह समारंभात वेगवेगळ्या विधीप्रसंगी चित्रपटातील संगीत आणि गाणी वाजवली जातात. भारत सरकारची पब्लीक नोटीस दिनांक २७ /०८/२०१९ अन्वये विधी विवाहाच्या वेळी संगीत/गाणी वाजविण्यास कॉपीराईट कायद्याचा भंग होत नाही, असे स्पष्टपणे जाहीर केले असताना काही कॉपीराईट कंपन्या वधूवर कुटुंबीयांकडून कॉपीराईट फीच्या नावा खाली बेकायदा फी उकळून नागरिकांची हजारो रुपयांची आर्थिक पिळवणूक करीत असल्याचा प्रकार कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन हद्दीत एका पंचतारांकित हॉटेलमध्ये घडल्याचे उघड झाले आहे.
कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रामध्ये एक नामांकित पंचतारांकीत हॉटेल असून, सदर हॉटेलमध्ये उच्चभ्रू व्यक्तींच्या मुला-मुलींचे विवाह व त्यासंबंधीचे समारंभ होत असतात. त्याकरीता मुला-मुलींचे वडील व नातेवाईक हे हॉल बुक करतात, परंतु अशा विवाहासंबंधीच्या समारंभात फोनोग्राफीक परफॉर्मन्स लिमिटेड (पीपीएल) नोव्हेक्स कम्युनिकेशन प्रा. लि. कंपनीचे पदाधिकारी हे कॉपीराईटचे एन.ओ.सी/लायसन्सच्या नावाखाली पैसे उकळत असलेबाबत तक्रार प्राप्त झाली.
प्राप्त तक्रारीची चौकशी केली असता कॉपीराईट अॅक्ट १९५७ चे कलम ५२(१) (झेडए) अन्वये लग्न व लग्नसोहळ्याशी संबंधित कार्यक्रमास कॉपीराईट अॅक्टमध्ये सूट देण्यात आलेली आहे. रजिस्टार ऑफ कॉपीराईट, भारत सरकार यांचे दि. २७/०८/२०१९ रोजी पब्लिक नोटीस अन्वये लग्न व लग्नाशी निगडित असलेल्या सर्व कार्यक्रमास कॉपीराईट संदर्भात लायसन्स / एन.ओ.सी. लागत नसलेबाबत नमुद आहे. याबाबत पीपीएल व नोव्हेक्स या कंपन्यांचे संचालक, पदाधिकारी यांना माहिती आहे. असे असताना वरील कंपनीचे संचालक पदाधिकारी, फिल्ड ऑफीसर्स व इतर हे संगनमत करून समारंभात अडथळा आणण्याची व केस करण्याची भीती दाखवून २०,००० ते ४०,००० रुपये खंडणी स्वरूपात वसूल करत असल्याबाबत व एन.ओ.सी./ लायसन्सवर लग्नसमारंभ असे नमुद न करता डीजे पार्टी, गेट टुगेदर पार्टी असे नमुद करतात असे निष्पन्न झाले आहे. तसेच नमुद कंपनी यांचेकडे कॉपीराईट अॅक्ट अन्वयेचे भारत सरकारचे रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र नाही
निखिल प्रमोद करमचंदाणी (वय ३०, रा. मोतीबाग गणेशखिंड रोड पुणे) यांच्या बहिणीचा दि. १६ ऑगस्ट २०२१ रोजी हॉटेल कॉनरेंड मंगलदास रोड, बंडगार्डन पुणे येथे विवाह होता. सदर विवाहाकरीता नोव्हेक्स व पीपीएल कंपनीचे पदाधिकारी यांनी फिर्यादीस कॉपीराईटचे एन.ओ.सी. / लायसन्स घेतले नाहीतर लग्नसमारंभात अडथळा आणू, केस करु अशी धमकी देऊन प्रत्येकी ४४,८००/- असे एकूण ८९,६००/- रुपये घेतले.
तसेच त्यांचे परिचीत राहुल मनोज शिरोडकर यांचे दि. १३ जुलै २०२१ रोजी हॉटेल कॉनरेंड मंगलदास रोड, बंडगार्डन पुणे या ठिकाणी लग्न होते, त्यांच्याकडूनही पीपीएल कंपनीने २२,४००/- व नोव्हेक्स कंपनीने २५,०००/- रुपये धमकी देऊन घेतले. असे एकूण दोन्ही लग्नाचे मिळून १,३७,०००/- रुपये खंडणी स्वरूपात उकळलेले आहेत आणि एन.ओ.सी. / लायसन्सवर डीजे पार्टी, गेट टुगेदर पार्टी असे नमुद केलेले आहे.
तसेच पुणे शहरातील वेगवेगळ्या पंचतारांकीत हॉटेलमध्ये असलेल्या लग्नसमारंभाची एन.ओ.सी./ लायसन्स देण्याच्या नावाखाली समारंभात अडथळा आणण्याची व कारवाई करण्याची धमकी देऊन नमुद पीपीएल व नोव्हेक्स या दोन्ही कंपनीचे संचालक, पदाधिकारी, फिल्ड ऑफीसर्स व इतर संबंधित व्यक्ती हे आपसात संगनमत करून कट रचून लग्न समारंभात खंडणी स्वरुपात पैसे उकळून आर्थिक फसवणूक करीत असलेबाबत त्यांची खात्री झाल्याने त्यांनी फोनोग्राफीक परफॉर्मन्स लिमीटेड (पीपीएल) व नोव्हेक्स कम्युनिकेशन प्रा. लि. यांचेविरूध्द फिर्याद दिल्याने कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
पंचतारांकीत हॉटेल्समध्ये विवाह समारंभात चित्रपटातील गाणी व संगीतविषयक कॉपीराईट कायद्याची भीती दाखवून फी स्वरूपात पैशाची फसवणूक झालेल्यांना त्याविषयी संबंधित पोलीस स्टेशन येथे अथवा पोलीस आयुक्त कार्यालय येथे माहिती तक्रार देऊन सहकार्य करावे, तसेच अशा बेकायदा आर्थिक पिळवणुकीबाबत सतर्क राहावे. -अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त, पुणे
