गुन्हे शाखा युनिट पाचची कामगिरी : सात वाहनांसह साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : मौजमजेसाठी वाहने चोरणाऱ्या चौघांना ताब्यात घेण्यात गुन्हे शाखा युनिट पाचला यश मिळाले असून, त्यांच्याकडून सात वाहनांसह साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चौघांमध्ये दोन विधिसंघर्षित बालकांचा समावेश आहे.
शुक्रवारी १ ऑक्टोबर रोजी युनिट ५ गुन्हे शाखा पुणे शहरकडील स्टाफ हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार विनोद शिवले, अकबर शेख व दाऊद सय्यद यांना त्यांच्या बातमीदारामार्फत बातमी मिळाली की वैभव बिनवडे व त्याचे साथीदार यांनी तीनआसनी रिक्षा चोरलेली असून ते मंतरवाडी, उंड्री भागात रिक्षा घेऊन फिरत आहेत. त्यामुळे युनिट ५ गुन्हे शाखेच्या स्टाफने मंतरवाडी भागात सापळा रचला असता, वैभव बिनवडे, किरण गायकवाड व दोन विधी संघर्षित बालके चोरीच्या रिक्षामध्ये फिरताना आढळून आले.
सदर रिक्षाबाबत हडपसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद असल्याचे आढळून आले. आरोपी वैभव बिनवडे (वय १९, रा. उंद्रे चाळ, माळवाडी, हडपसर, पुणे), किरण गायकवाड (वय १९, रा. मूळगाव केडगाव, ता. करमाळा जि. सोलापूर) यांना दाखल गुन्ह्यात अटक करून त्याच्याकडे कसोशीने तपास केला असता त्यांनी मौजमजेसाठी सात वाहने (त्यामध्ये ६ मोटर सायकल व एक तीनआसनी रिक्षा) आणि एक जबरी चोरी करुन मोबाईल फोन चोरल्याची कबुली दिली असून त्यांच्याकडुन एकूण ३,५०,००० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आलेला आहे. आरोपींकडून सात वाहनचोरीचे व एका जबरी चोरीचे असे आठ गुन्हे उघडकीस आलेले आहेत. आरोपी सोबत दोन विधिसंघर्षीत बालके असून फक्त मौजमजेसाठी ते वाहनांची चोरी करीत असल्याची कबुली त्यांनी दिलेली आहे.
सदरची कामगिरी ही, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) भाग्यश्री नवटके, पोलीस उपआयुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, सहायक पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे, पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ शेंडगे, पोलीस अमंलदार रमेश साबळे, प्रमोद टिळेकर, दया शेगर, विनोद शिवले, अकबर शेख, दाऊद सय्यद, महेश वाघमारे, अजय गायकवाड, चेतन चव्हाण, दीपक लांडगे, प्रवीण काळभोर, विशाल भिलारे, आश्रुबा मोराळे, पृथ्वीराज पांडुळे, दत्तात्रय ठोंबरे, अमर उगले, स्वाती गावडे, स्नेहल जाधव, संजयकुमार दळवी यांनी केलेली आहे.
