दरोडा व वाहनचोरी पथक एकची कामगिरी : चोरीला गेलेला हँडसेट ताब्यात
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : जबरदस्तीने मोबाईल चोरणाऱ्यास जेरबंद करण्यात दरोडा व वाहनचोरी पथक एकला यश मिळाले असून, आरोपीकडून चोरीला गेलेला हँडसेट ताब्यात घेण्यात आला आहे.
दाखल गुन्ह्यातील फिर्यादी हे २२ सप्टेंबर रोजी त्यांच्या मोटारसायकलवरून पुणे-मुंबई हायवे रोडलगत खडकी पुणे या रोडने जात होते. सुलभ शौचालयातून बाहेर येताच त्यांच्या पाठीमागून एक अनोळखी इसम चालत येऊन त्यांना धडकल्याने त्यांनी धडकलेल्या इसमाकडे वळून पाहिले असता त्या अनोळखी इसमाने काही एक न बोलता त्यांच्या हातात असलेला मोबाईल हॅन्डसेट जबरदस्तीने हिसका मारून चोरला आणि तो मुंबई हायवे रोडने पळून गेला. घाबरलेले असल्याने फिर्यादी यांनी दिनांक ०१ ऑक्टोबर रोजी एका अनोळखी इसमाविरुध्द खडकी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती.
शुक्रवारी १ ऑक्टोबर रोजी दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक क्रं. १ गुन्हे शाखा, पुणे शहर येथे कार्यरत असलेले पोलीस अंमलदार पोलीस नाईक मॅगी जाधव आणि धनंजय ताजणे यांना त्यांच्या गोपनीय बातमीदाराकडून नमुद गुन्ह्यातील अज्ञात आरोपी हा शिवाय स्नॅक्स, हॉटेल प्राईड शेजारील गल्लीमध्ये, शिवाजीनगर, पुणे येथे थांबलेला असल्याची खात्रीशीर बातमी प्राप्त झाल्याने सदर बातमीबाबत वरिष्ठांना माहिती देऊन वरिष्ठांच्या परवानगीने पोलीस स्टाप यांना बातमीचे ठिकाणी रवाना करून अज्ञात आरोपी मिळताच त्यांना समक्ष हजर करणेबाबत आदेशित केले होते.
प्राप्त बातमीचे अनुषंगाने पोलीस स्टाफ हे हॉटेल प्राईड शेजारील गल्लीमध्ये, शिवाजीनगर, पुणे येथे थांबून आजूबाजूस पाहणी केली असता, वर नमुद वर्णनाचा इसम हा शिवाय स्नॅक्स, हॉटेल प्राईड शेजारील गल्लीमध्ये थांबला असल्याचे दिसून आल्याने सदर इसमास सापळा रचून ताब्यात घेतले.
अलिअब्बास शौकत इराणी ( वय २२, रा. पाटील इस्टेट, पुणे) असे त्याचे नाव असून त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक मोबाईल हॅन्डसेट मिळून आल्याने त्याचेकडे मोबाईलबाबत अधिक चौकशी करता त्याने सदरचा मोबाईल हा वाकडेवाडी, पुणे येथील सुलभ शौचालयाकरीता थांबलेल्या एका इसमाकडून जबरदस्तीने चोरला असल्याचे सांगितले. सदर आरोपीस ताब्यात घेऊन पुढील चौकशीकामी दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक- १, गुन्हे शाखा, पुणे शहर कार्यालयात आणून दाखल गुन्ह्याचे अनुषंगाने त्याचेकडे अधिक चौकशी करता त्याचा दाखल गुन्ह्यातील सहभाग निष्पन्न झाल्याने त्यास दाखल गुन्ह्यात अटक केली आहे. दाखल गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस फौजदार एस. वाय. शेख करीत आहेत.
सदरची कारवाई ही, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) भाग्यश्री नवटक्के, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १ गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शेवाळे, सहा. पोलीस फौजदार शाहिद शेख, पोलीस हवालदार नीलेश शिवतरे, पोलीस नाईक मॅगी जाधव, धनंजय ताजणे, गणेश ढगे, व पोलीस अंमलदार सुमित ताकपेरे, श्रीकांत दगडे, ऋषिकेश कोळप दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १ गुन्हे शाखा, पुणे शहर यांनी केली आहे.
