लोणी काळभोर पोलीस स्टेशनमधील घटना : सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी आठ जणांवर गुन्हा
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : कायदेशीर कारवाई होऊ नये म्हणून पोलिसांवर दबाव आणण्याच्या उद्देशाने बेकायदेशीरपणे जमाव जमवून त्यातील तिघांनी स्वत:च्या अंगावर डिझेल ओतून पेटवून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली. यावेळी त्यांना अडवण्यासाठी गेलेल्या पोलिसांना धक्काबुक्की करुन सरकारी कामात अडथळा निर्माण केला. ही घटना लोणी काळभोर पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि.12) रात्री साडेनऊच्या सुमारास घडली.
शंकर तानाजी धायगुडे (वय-23), संतोष सुरेश माळी (वय-30), रतन तानाजी धायगुडे (वय-52), दुर्गेश तानाजी धायगुडे (वय-25), नागेश चंद्रकांत वाघमारे (वय-25) शुभम सुदाम विरकर (वय-20), संगीता शिवाजी धायगुडे (वय-48) आणि अंजना मारुती धायगुडे (वय-58 सर्व रा. लोणी काळभोर) यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार संतोष मारुती होले यांनी लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये याबाबत फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी सांगितले की, आरोपी मंगळवारी रात्री पोलीस स्टेशनच्या आवारात अचानकपणे आले व आमच्यावर कारवाई कशी करता. असे म्हणत आरडाओरडा सुरु केला. यावेळी घोषणाबाजी करुन परिसरात दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला. या संदर्भात पोलिसांनी त्यांच्याकडे विचारणा केली असता, एकाने तुम्ही माझ्याविरोधात तक्रार कशी दाखल करुन घेतली. तुम्ही आमच्यावर कारवाई कशी करता बघू. मी तुम्हाला बघून घेतो, असे म्हणत प्लास्टिकच्या बाटलीत आणलेले डिझेल अंगावर ओतून घेतले. काडेपेटी आणून दे, मी आत्ता पेटवून घेऊन जीव देतो, तुम्ही आमच्यावर कारवाई कशी करता ते बघून घेतो, असे म्हणाला. त्याचवेळी त्याच्यासोबत आलेल्या एकाने तू अंगावर डिझेल ओतून घे, काय आहे ते मी बघून घेतो, असे म्हटले. दुसऱ्या व्यक्तीने बाटलीतील डिझेल अंगावर घेतलेले ओतून पाहून एका महिलेनेही अंगावर डिझेल ओतून काडीपेटी दे, म्हणत स्वत:ला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला.
यावेळी सहायक पोलीस निरीक्षक दादाराजे पवार, पोलीस उपनिरीक्षक भागवत शेंडगे, निकेतन निंबाळकर, संतोष होले, महिला पोलीस हवालदार वैशाली निकंबे व गुन्हे शोधक पथकाली अंमलदार यांनी त्यांना अटकाव करण्याचा प्रयत्न केला. मात्र, उलट आरोपींनी पोलिसांनाच धक्काबुक्की करुन सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.