घोरपडी-डोबरवाडीतील घटना : शुक्रवारी रात्री ८ ते शनिवारी सकाळी ८च्या दरम्यान घडली घटना
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : डोबरवाडी (घोरपडी येथील श्री महालक्ष्मी प्रतिष्ठान मंदिरातील दानपेटीतून रोख दोन हजार आणि सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण १६ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरीला गेला. ही घटना शुक्रवारी (दि. २२ ऑक्टोबर) रात्री ८ ते शनिवारी (दि. २३ ऑक्टोबर) सकाळी ८ या दरम्यान घडली.
सुरेश पुजारी (वय ५३, रा. डोबरवाडी, घोरपडी, पुणे) यांनी वानवडी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, डोबरवाडी येथे श्री महालक्ष्मी सामाजिक प्रतिष्ठान मंदिर आहे. मंदिर शुक्रवारी (दि. २२ ऑक्टोबर) रात्री ८ वाजता बंद केले, त्यानंतर शनिवारी (२३ ऑक्टोबर) सकाळी ८ वाजता उघडण्यासाठी पुजारी गेले, त्यावेळी मंदिराचा दरवाजा उघडा दिसला. दरम्यान वानवडी पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी मंदिरात पाहणी केली असता, दानपेटीतील रोख दोन हजार रुपये आणि सोन्या-चांदीचे दागिने मिळून १६ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचे निदर्शनास आले.
पुढील तपास वानवडी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक जयवंत जाधव करीत आहेत.
