मार्केटयार्ड पोलिसांत सहा जणांवर गुन्हा : आंबेडकरनगर येथे रविवारी पहाटे घडला प्रकार
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : मार्केटयार्डमध्ये डाळींब पॅकिंगच्या कामावर आलेल्या तरुणाला तुमच्यामुळे आमच्या मुलांना रोजगार मिळत नाही, असे म्हणून तलवारीने वार करुन जीवे मारण्याचा प्रकार घडला. याप्रकरणी मार्केटयार्ड पोलिसांनी ६ जणांवर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून पाच जणांना अटक केली आहे. हा प्रकार आंबेडकरनगर येथील गॅस गोडाऊनजवळ रविवारी पहाटे दोन वाजता घडला.
अतुल शिंदे (वय २७), तौसिक खान (वय २७), जहीर शेख (वय २८), विकास ढवळे (वय २७), सायबा कोळी (वय २६) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी आतिश गुलाब शिरसाट (वय २३, रा. आंबेडकरनगर, मार्केटयार्ड) यांनी मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात (गु. र. नं. १४७/२१) फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी सांगितले की, मार्केटयार्डमध्ये डाळींबाचा मोठा व्यापार चालतो. शेतकर्यांकडून आलेली डाळींब बॉक्समध्ये टाकून त्यांचे पॅकिंग करण्यासाठी पहाटेपासून अनेक जणांची गरज असते. आतिश शिरसाट व त्यांच्याबरोबर काही मुले हे काम करतात. तसेच, आरोपी हे बिबवेवाडी व आंबेडकरनगर येथे राहणारे आहेत.
पॅकिंगसाठी जास्त जण आल्याने अनेकांना दररोज रोजगार मिळतोच असे नाही. रविवारी मोठ्या प्रमाणावर माल येत असतो.
त्यामुळे पॅकिंगचे काम करणार्या या तरुणांमध्ये काम मिळण्यावरुन वाद सुरु होते. आतिश शिरसाट हे रविवारी पहाटे कामाला जात असताना आरोपींनी त्यांना वाटेत अडविले. उद्यापासून तुझ्या मित्रांसोबत मार्केटयार्ड येथे डाळींब पॅकिंगचे कामास येऊ नको.
तुमच्यामुळे आमच्या मुलांना रोजगार मिळत नाही, असे म्हणून त्यांनी शिरसाट यांना शिवीगाळ करुन त्यांच्या डोक्यात, पाठीवर तलवारीने वार करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक मुंढे करीत आहेत.
