सायबर पोलिसांची कामगिरी : १२ लाख १९ हजार ९४९ रुपयांना घातला होता गंडा
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : मॅट्रोमोनी साईटद्वारे विवाहोच्छुकांना गंडा घालणाऱ्या दोन नायजेरियन आरोपींना दिल्लीतून अटक केले आहे. पुणे सायबर पोलिसांनी ही कामगिरी केली. आरोपींनी १२ लाख १९ हजार ९४९ रुपयांना गंडा घातल्याची तक्रार सायबर पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली होती. ही घटना जून-जुलै २०२० दरम्यान घडली होती.
चिदिबेरे नवोसु उर्फ जेम्स नवोसु Chidibere Nwosu s/o James Nwosu (वय-36) ओकोरो बेसिल इफेनीचुकु उर्फ लेट क्लेक्सुकु Okoro Basil Ifeanyichukwu s/o Late Klecsukwu (वय-41 दोघे रा. बी. 35, ओमिक्रॉन 1 ए, ग्रेटर नोएडा, उत्तर प्रदेश, मूळ रा. नायजेरिया) असे अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींची नावे आहेत.दरम्यान, आरोपींना सूरजपूर, ग्रेटर नोएडा, गौतमबुद्धनगर, उत्तर प्रदेश येथील मा. न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने २९ ऑक्टोबर २०२१ ट्रान्झिट रिमांड मंजूर केली आहे.
शहरातील महिलेशी संकेतस्थळावरून अज्ञाताने ओळख करून परदेशात नोकरी करीत असल्याचे सांगून लग्नाचे आमिष दाखविले. वेगवेगळी कारणे सांगून दोन बँक अकाउंटमध्ये रक्कम पाठविण्यास सांगून १२ लाख १९ हजार ९४९ रुपयांना गंडा घातल्याची तक्रार सायबर पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली होती. ही घटना जून-जुलै २०२० दरम्यान घडली होती.
सायबर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या साहाय्याने आरोपीचा शोध घेतला असता, ग्रेटर नोएडा उत्तर प्रदेश येथे असल्याची माहिती मिळाली. आर्थिक व सायबर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने घटनास्थळी धाव घेत दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके, सहायक पोलीस आयुक्त विजय पळसुले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. एस. हाके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण, सहायक पोलीस निरीक्षक शिरीष भालेराव, पोलीस उपनिरीक्षक आनंदराव ढवळे, पोलीस अंमलदार अस्लम अत्तार, योगेश वाव्हळ, नितेश शेलार, वैभव माने, सौरभ घाटे, अंकिता राघो, शिरीष गावडे, मंगेश नेवले, प्रविणसिंग राजपूत यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
अनोळखी व्यक्तीबरोबर मैत्री व आर्थिक व्यवहार टाळा…
ऑनलाइन पद्धतीने विवाह संकेतस्थळावरून अनोळखी व्यक्तींशी ओळख वाढवू नये, कोणत्याही प्रकारचे आर्थिक व्यवहार करू नयेत, तसेच इतर सोशल साईट्सवरदेखील ऑनलाइन ओळख करून मैत्री वाढवणाऱ्या अज्ञात गुन्हेगारांपासून सावध राहण्याचे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.
