आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

तंबाखू आणि बिडी बनावट उत्पादक जेरबंद

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • October 27, 2021
Spread the love

सोलापूर ग्रामीण पोलिसांची गोंदियात जाऊन कारवाई : सव्वातीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत

महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क

सोलापूर : बनावट गायछाप तंबाखू व वेगवेगळ्या कंपनीचे बनावट लेबल लावलेले बिडी बंडल तयार करणाऱ्यास गोंदिया येथे जाऊन जेरबंद करण्यात सोलापूर ग्रामीण पोलिसांना यश मिळाले असून, एकूण सव्वातीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

दिनांक १६/०९/२०२१ रोजी सकाळी दहाच्या सुमारास कुलस्वामी किराणा दुकान, कुरूल (ता. मोहोळ जि. सोलापूर) येथील दुकानामध्ये फिर्यादी सोमाणी यांना बनावट गायछाप तंबाखूचे पुडे मिळून आले. त्याबाबत त्यांनी माहिती घेतली असता त्यांना असे समजले की, आग्रा (उत्तर प्रदेश) येथील राहणारा एका इसमाने आमचे मालपानी ग्रुप कंपनी संगमनेर, जिल्हा अहमदनगर या कंपनीची फसवणुक करून गायछाप पुडी बनवण्यासाठी लागणारा पेपर, पाकीट, लेबल, बॉटम फोल्ड, तंबाखु, व बनावट दस्त इत्यादीचे बनावटीकरण करून गायछाप तंबाखू नावाचा ट्रेड मार्क वापरून गायछाप तंबाखू पुड्यांची हुबेहुब पाकीटे तयार करून ती पाकिटे बनावट असल्याचे माहिती असतानादेखील त्यांनी मालपाणी ग्रुप कंपनीचे असल्याचे भासवून गायछाप तंबाखू काही इसमांच्या मार्फतीने महाराष्ट्र राज्यात विक्री करणेकामी वितरीत करून ग्राहकांची फसवणुक करून शासनाचा महसुल बुडवुन तसेच मालपानी ग्रुप कंपनीची फसवणुक केली आहे. म्हणून, कैलास रामेश्वर सोमाणी (वय ५१, सेल्स मॅनेजर, सोलापूर जिल्हा) रा. मंत्रीचंडक कॉम्लेक्स, सम्राट चौक, सोलापूर यांनी फिर्याद दिल्याने कामती पोलीस ठाणे येथे दिनांक ०७/१०/२०२१ रोजी गुन्हा दाखल केला आहे.

सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्ह्यातील फसवणुकीचा व बनावटीकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना सदर गुन्ह्यातील आरोपीतांचा शोध घेऊन जेरबंद करण्याकामी पथक नेमण्यास सांगितले, त्यावरून पोलीस निरीक्षक, सर्जेराव पाटील स्थानिक गुन्हे शाखा यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक, रवींद्र मांजरे व त्यांचे पथक नेमले होते.

सदर गुन्ह्यातील आरोपी रमेश वासुदेव गुप्ता ( वय 55 ) राहणार शिवाजी वाड, गड्डा टोळी , गोंदिया हा आग्रा (उत्तर प्रदेश) येथील असल्याचे समजल्याने वरिष्ठांच्या परवानगीने पथकाने आग्रा उत्तर प्रदेश येथे जावुन तपास केला, सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये गुन्हयांचा तांत्रिक विश्लेषनावरून माहिती मिळाली की, बनावट गायछाप तंबाखुचे पुडे बनविणारा इसम हा गोंदिया शहरातील राहणारा असल्याचे समजले. त्यावरून पथक गोंदिया शहरात जाऊन स्थानिक पोलीसांची मुख्य मदत घेऊन संबंधित इसमाचे घर व गोडाऊनची झडती घेतली असता, झडतीत घरात व गोडाऊन मध्ये बनावट गायछाप तंबाखूचे तयार केलेले पुडे, तंबाखु पुडे बनविण्याकरीता लागणारे बनावट लेबल, बनावट छापील पाकिटे, तंबाखू, इलेक्ट्रिक वजन माप, तंबाखू पुड्याचे पाकीटे तयार करण्याकरिता वापरण्यात येणारी लाकडी पेटी तसेच साबळे, वाघिरे आणि कंपनी, गौतम गोल्ड, भारत बिडी वर्क्स, देसाई बिडी, देसाई दत्त बिडी, जसवंत छाप टेलीफोन बिडी, बहादुर बिडी, गोपाल गोल्ड बिडी, तंबाखुचे पोते असा एकूण ३,३५,०७२/- रुपये किमतीचा बनावट मुददेमाल मिळून आला.

सदरची कामगिरी ही, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे, सहायक फौजदार खाजा मुजावर, पोलीस अंमलदार नारायण गोलेकर, सलीम बागवान, रवी माने, पोलीस नाईक समीर शेख यांनी बजावली आहे.