सहकारनगर पोलिसांकडून पर्दाफाश : लाखो रुपयांचे घबाड उघड
महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क
पुणे : बनावट चेकद्वारे शासनाची आर्थिक फसवणूक करणाऱ्या पाच सराईत गुन्हेगारांचा सहकारनगर पोलिसांकडून पर्दाफाश करण्य़ात आला असून, लाखो रुपयांचे घबाड उघड झाले आहे.
दि. २२ ऑक्टोबर रोजी दुपारी एकच्या सुमारास बँक ऑफ बडोदा शाखा सातारा रोड पुणे येथील बँकेत एक इसम आगरतळा महानगरपालिका आयुक्त याचे नावाने बनावट चेक घेऊन वटवण्यासाठी बँकेत येणार, अशी खात्रीशिर बातमी सहकारनगर पोलीस ठाणेकडे नेमणुकीस असलेले पोलीस अंमलदार सागर शिंदे व प्रदीप बेडीस्कर यांना मिळाल्याने त्यांनी मिळालेल्या बातमीबाबत वरिष्ठांना, पोलीस निरीक्षक (गुन्हे) युनुस मुलाणी यांना माहिती दिली. प्राप्त माहितीच्या आधारे तपासपथकातील पोलीस अधिकारी सुधीर घाडगे व त्यांच्या सर्व स्टाफसह सदर ठिकाणी जाऊन सापाळा रचून चेक वटवण्यासाठी येणारा इसम विश्वनाथ आनंद किरतावडे (वय ४८, रा. बालाजीनगर, धनकवडी, पुणे) आणि त्याचे दोन साथीदार- सूधेश मधुकर आव्हाड (वय ५८, रा. शिवनेरीनगर कोंढवा पुणे) आणि सागर प्रेमचंद पारख (वय ३८, रा. शास्त्रीनगर, येरवडा, पुणे) यांना ताब्यात घेऊन पुढील तपासकामी सहकारनगर पोलीस ठाण्यास आणले. त्यांच्या विरुद्ध शाखा प्रबधंक, बँक ऑफ बडोदा यांनी लेखी तक्रार दिल्याने सहकारनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करून या दाखल गुन्ह्यात सदर आरोपींना अटक करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) युनुस मुलाणी करीत आहेत.
दाखल गुन्ह्यातील अटक आरोपी यांना विश्वासात घेवून आणखी काही साथीदार आहेत का, याबाबत तपास केला असता तपासा दरम्यान त्यांनी त्यांचे साथीदार श्रवण मल्लया तगलापेल्ली (वय २८, रा. कपिल चौक जवळ, महाकाली कॉल्लरी, चंद्रपूर), विकास भुनलाल यादव (वय ३०, रा. सिव्हिल लाईन माता मंदिर चौकाजवळ, गोंदिया) असे असल्याचे सांगितले. सदर आरोपीस तपास पथकातील अधिकारी व स्टाफ यांनी पुणे स्टेशन येथे आजूबाजूला थांबून सापळा रचून वरील इसमांना वर्णनावरुन ताब्यात घेऊन पोलीस ठाणे येथे आणून त्यांचेकडे दाखल गुन्ह्याबाबत चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिल्याने सदर आरोपींना अटक करण्यात आली आहे.
तसेच त्यांच्याकडे अधिक तपास केला असता त्यांनी यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील बँक ऑफ बडोदा येथे बनावट चेकद्वारे मुख्य लेखापाल चंदीगड यांच्या खातेमधील २८ लाख रुपये काढले असून त्याबाबत चंदीगढ येथील सेक्टर नं १७ पोलीस ठाणेस गुन्हा दाखल असून त्यात श्रवण तगलापेल्ली व विकास यादव हे मुख्य आरोपी निष्पण झाले आहेत. सदर आरोपींनी भारतात अशा प्रकारे शासकीय अधिकाऱ्याच्या चेक व सही शिक्क्याचा दुरुपयोग करुन आणखी गुन्हे करून कोट्यावधी रुपयांची फसवणूक असल्याचे शक्यता नाकरता येत नाही.
सदरची कामगीरी ही, अपर पोलीस आयुक्त डॉ. राजेंद्र डहाळे, पोलीस उप-आयुक्त सागर पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वाती देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) युनुस मुलाणी, सहाय्यक पोलीस निरीक्षक मोहसीन पठाण, पोलीस उपनिरीक सुधीर घाडगे, पोलीस अंमलदार बापू खुटवड, अरुण मोहिते, सुशांत फरांदे, महादेव नाळे, भुजंग इंगळे, मनोज निर्मळे, सागर शिंदे, प्रदीप बेडीस्कर, सागर सुतकर, निखिल राजीवडे, महेश मंडलीक व भाऊसाहेब आहेर यांनी केली आहे.
