पुणे सायबर पोलिसांची कामगिरी : मित्रानेच केली रिसर्च रिपोर्टची चोरी
महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क
पुणे : कंपनीच्या डाटाचा गैरवापर करून कंपनीची आर्थिक फसवणूक करणाऱ्या सायबर चोरास भोसरी येथून जेरबंद करण्यात पुणे सायबर पोलिसांना यश मिळाले असून कंपनीच्या डाटाचा गैरवापर करून कंपनीची आर्थिक फसवणूक करणाऱ्या इसमास भोसरी, पुणे येथून अटक करण्यात आली आहे.
गुन्ह्यातील फिर्यादीच्या मालकीची मेसर्स मेल्विन ब्राइट ही कंपनी सन २०१५ पासून चालू असून त्या कंपनीमार्फत मार्केट रिसर्च ॲन्ड बिझनेस कन्सल्टन्सीचे काम देश-विदेशात चालते. त्यासाठी त्यांनी स्वतःच्या मालकीचे रिसर्च रिपोर्ट डेव्हलप केलेले आहेत. त्यांनी त्यांचे बरेचसे रिसर्च रिपोर्ट कॉपी राईट कायद्यान्वये रजिस्टर करुन घेतलेले आहेत. ऑक्टोबर २०१८ मध्ये त्यांचे कंपनीस मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे आढळल्याने त्याचा शोध घेत असताना त्यांच्या कंपनीच्या info@melvinbright.com या ईमेल आयडीवर आलेल्या अनोळखी ईमेल वरून समजले की, स्टेइंग मार्केट रिसर्च या कंपनीमार्फत फिर्यादीचे कंपनीचे रजिस्टर्ड रिसर्च रिपोर्ट त्यांच्या वेबसाईटच्या मार्फतीने अनधिकृतपणे विक्री केले जात आहेत. फिर्यादीच्या कंपनीच्या रिसर्च रिपोर्टच्या किमतीच्या दहा पटीने कमी रकमेत सदरचे आयते मिळालेले रिसर्च रिपोर्ट स्टेइंग मार्केट रिसर्च या कंपनीमार्फत विकले जात होते.
त्या कंपनीचा फिर्यादीने शोध घेतला असता ती कंपनी त्यांचाच मित्र व यापूर्वी फिर्यादीच्या कंपनीत काम करणारा मनेश गायकवाड याच्या भावाची पत्नी यांच्या नावाने रजिस्टर होती. परंतु प्रत्यक्ष रिसर्च रिपोर्ट विकण्याचे काम आरोपी मनेश गायकवाड करत होता. मनेश गायकवाड यास फिर्यादीने कामावर ठेवले असताना त्याची रहाण्याची सोयसुद्धा कंपनीत केलेली असताना त्यादरम्यान त्याने फिर्यादीचे कंपनीतील रिसर्च रिपोर्टची चोरी करुन स्वतःकडे ठेवले होते. सदर बाब उघड झाल्यानंतर आरोपीने फिर्यादीची माफी मागून त्यास पकडलेला डाटा असलेली साधने त्यांच्या ताब्यात दिली होती. त्यानंतर ही त्याने त्याच्याकडे ठेवलेल्या वेगळ्या स्टोरेज मधील फिर्यादीचे कंपनीचे रिसर्च रिपोर्ट वापरून पुन्हा त्याचे वेगवेगळ्या नातेवाइकाच्या नावे Genesis Market Research, AMS Market Insights व AMG Market Reserch अशा त्या क्षेत्रांतील नवीन कंपन्या स्थापन करून त्याद्वारे भारतात व भारताबाहेरील कंपन्याना फिर्यादीचा रिसर्च रिपोर्ट विकून एकूण ५२ लाख ४२ हजार रूपये बेकायदा नफा मिळविल्याचे फिर्यादी यांनी फिर्याद दिल्याने सायबर पोलीस स्टेशन, पुणे शहर येथे कॉपीराईट कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर गुन्ह्यामध्ये फिर्यादी यांनी सादर केलेली कागदपत्रे व खाजगी संस्थेमार्फत केलेल्या फॉरेन्सिक रिपोर्टचे अवलोकन केले असता यातील आरोपी मनेश गायकवाड याचा शोध घेऊन त्याचेकडे तपास करणे आवश्यक झाल्याने आम्ही स्वतः व सायबर पोलीस स्टेशनकडील पथक असे त्याचा शोध घेणेकामी भोसरी, पुणे येथे गेलो असता आरोपी नामे मनेश गायकवाड हा मिळून आला. त्याच्याकडे केलेल्या प्राथमिक तपासामध्ये त्याचा सदर गुन्ह्यामध्ये सक्रिय सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास सायबर पोलीस स्टेशन पुणे शहर येथे सोमवारी २५ ऑक्टोबर रोजी रात्री पावणेदहा वाजता अटक करण्यात आली. सदर आरोपीची २८ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजूर आहे. सदर गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक मीनल सुपे-पाटील या करीत आहेत.
सदरची कामगिरी ही, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपआयुक्त भाग्यश्री नवटके, सहायक पोलीस आयुक्त विजय पळसुले यांच्या सूचनेनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक (सायबर पोलीस स्टेशन, पुणे) हाके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मीनल सुपे-पाटील, पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गवारी, सागर पडवळ, अंमलदार राजकुमार जाबा, नीलेश लांडगे, शाहरूख शेख, श्रीकांत कबुले, शिरीष गावडे यांच्या पथकाने केली आहे.
