कोंढवा पोलिसांची कामगिरी : लाख रुपयांचे सोन्याचे दागिने हस्तगत
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : घरफोड्या करणाऱ्या सराईतास अवघ्या २४ तासांत जेरबंद करण्यात कोंढवा पोलिसांना यश मिळाले असून, त्याच्याकडून लाख रुपयांचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.
कोंढवा पोलीस ठाण्यातील घरफोडीच्या दाखल गुन्ह्यातील अज्ञात आरोपीचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) जगन्नाथ जानकर यांनी केलेल्या सूचनेप्रमाणे शोध तपासपथक अधिकारी पोलीस उपनिरीक्षक पी. यू. कापुरे, तपासपथक अंमलदार सहाय्यक पोलीस फौजदार सैय्यद, दीपक जडे, अमोल हिरवे, योगेश कुंभार, गणेश चिंचकर, अभिजित रत्नपारखी कोंढवा पोलीस ठाणे हद्दीत शोध घेत होते.
सदर गुन्हा हा आरोपी कौसर अफसर सैय्यद (वय २१, रा. नवाजीश पार्क, माविया मस्जिद शेजारी, कोंढवा खुर्द, पुणे) याने केला असल्याची गुप्त माहिती पोलीस अंमलदार असगरअली सैय्यद, दीपक जडे, अमोल हिरवे यांना प्राप्त झाली. सदर मिळालेल्या बातमीवरून त्याचा शोध घेत असताना तो सन्डे बाजार मैदानात कोणास तरी भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती प्राप्त झाली.
मिळालेल्या बातमीवरून त्यास ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या अंगझडतीत १,०४,००० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने मिळून आले. त्याबाबत त्याच्याकडे तपास केला असता त्याने मक्का टॉवर साईबाबा मंदिराशेजारी गट नंबर ९, साईबाबा नगर कोंढवा पुणे येथून घराचे कुलूप तोडून फ्लॅटमध्ये प्रवेश करून घरफोडी केली असल्याचे सांगितले. सदर आरोपी हा घरफोडी करणारा रेकार्डवरील आरोपी आहे. सदर कामगिरीबाबत पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी कोंढवा पोलीस स्टेशनचे कौतुक केले आहे.
सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपआयुक्त, परिमंडळ-५, पुणे शहर व सहाय्यक पोलीस आयुक्त वानवडी विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.
