बांधकाम व्यावसायिकांकडून खंडणी मागणारे जेरबंद
गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक-२ची कारवाई : बदनामी करण्याची दिली होती धमकी
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : बांधकाम व्यावसायिकांना माहिती अधिकार कायद्याची भीती दाखवत लाखो रूपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला होता. तसेच खंडणी दिली नाही तर बदनामी करण्याची धमकी आरोपी राजेश बजाज आणि बापू शिंदे यांनी बांधकाम व्यावसायिकास दिली होती. याप्रकरणी पुण्यातील विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक दोनने आरोपींचा शोध घेऊन त्यांना जेरबंद केले .
बांधकाम व्यावसायिकाच्या फिर्यादीवरून पोलिसांनी राजेश उर्फ बॉबी खैरातीलाल बजाज उर्फ सचदेव (रा. अंकुर सोसायटी, कमला नेहरु पार्क, शिवाजीनगर) आणि बापू गोरख शिंदे (रा. मानाजीनगर, नऱ्हे रोड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. हा प्रकार डिसेंबर 2019 ते 16 सप्टेंबर 2021 या कालावधीत घडला होता. गुन्ह्याचा तपास करत असताना गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाला मुख्य आरोपी राजेश बजाज हा एम.जी. रोडवरील लष्कर न्यायालयाजवळ येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सापळा रचून बजाज याला अटक केली आहे. तर दुसरा आरोपी बापू शिंदे याला नऱ्हे येथून अटक करण्यात आली आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना 29 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
आरोपी विरोधात डेक्कन, कोरेगाव पार्क आणि शिवाजीनगर पोलीस ठाण्यात 2 असे एकुण चार गुन्हे दाखल आहेत.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहाय्यक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण, अंमलदार सुरेंद्र जगदाळे, शैलेश सुर्वे, सचिन अहिवळे, राहुल उत्तरकर, विनोद साळुंके, प्रविण पडवळ, संग्राम शिनगारे, विजय गुरव, संपत औचरे, सौदाबा भोजराव, अमोल पिलाणे, मोहन येलपल्ले, चेतन शिरोळकर, रुपाली कर्णवर, आशा कोळेकर यांच्या पथकाने केली.
