समर्थ पोलिसांकडून तिघे ताब्यात : नाकाबंदी व गस्त दरम्यान तीन गुन्हे उघडकीस
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : समर्थ पोलिसांकडून केलेल्या कारवाईत नाकाबंदी व गस्त दरम्यान एकाच दिवशी एकूण तीन गुन्हे उघडकीस आले आहेत. यात दुहेरी घरफोडी व वाहनचोरीतील तिघा चोरट्यांना जेरबंद करण्यात येऊन दोन दुचाकी आणि ३०,००० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
बुधवारी (२७ ऑक्टोबर) फिर्यादीने त्यांचे रास्ता पेठ पुणे येथील राहत्या बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये हायड्रोलिस होस पाईप व्यवसायाचे सामान चोरी झाल्याबाबत तक्रार दाखल केली होती, तसेच समर्थ पोलीस स्टेशन हद्दीत संत कबीर चौक, नाना पेठ, पुणे येथून काही महिन्यांपूर्वी ॲक्टिवा गाडी चोरी झाल्याबाबत फिर्यादीने तक्रार दाखल केली होती. सदर गुन्ह्यांचा तपास सुरू होता.
समर्थ पोलीस ठाण्याकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या आदेशाने तपासपथकातील अधिकारी व अंमलदार गुन्हे प्रतिबंधक गस्त व नाकाबंदी नियमित करीत असतात, तपासपथकातील काही अंमलदार हे गस्त करीत होते. बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमीनुसार दोन संशयित घरफोडी करणारे चोर हे रास्ता पेठ, पुणे येथे बसले असल्याचे माहिती मिळाल्यावरून त्या ठिकाणी जागून बातमीदाराने सांगितल्याप्रमाणे बातमीमधील इसमांची खात्री करून त्यांना ताब्यात घेण्यात आले.
राकेश राजू घाडगे (वय २१, रा. भवानी पेठ, पुणे) आणि रामा देवा चाकले (वय १९, रा. सोमवार पेठ, पुणे) अशी त्यांची नावे असून, गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता, त्यांनी २७ ऑक्टोबर रोजी दाखल असलेला घरफोडीचा गुन्हा केल्याची कबुली देऊन त्यांनी सदर घरफोडीतील ३०,००० रुपयांचा मुद्देमाल काढून दिला. याबाबत समर्थ पोलीस स्टेशन येथे घरफोडीचा गुन्हा दाखल असून, सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक ज्योती कुटे या करीत आहेत.
समर्थ पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या वाहनचोरीतील आरोपींचा शोध घेण्याकरिता मंगळवार पेठ भागात २७ ऑक्टोबर रोजी नाकाबंदी करण्यात आली होती. या नाकाबंदीदरम्यान बीट मार्शलसह पोलीस अंमलदार शुभम देसाई व महेश जाधव वाहनतपासणी करीत असताना समोरून येणाऱ्या एका ॲक्टिवावरील चालकाच्या संशयास्पद हालचाली वाटल्याने त्यास थांबवून त्यांच्याकडे वाहनाची कागदपत्रांबाबत विचारणा केली. परंतु त्याने वाहनाचे कागदपत्रे न दाखविता उडवाउडवीचे उत्तरे दिल्याने त्याच्याविरुद्ध जास्त संशय वाटल्याने त्यास ताब्यात घेण्यात आले. महादेव राजू दोडमणी (वय २५, रा. यमुनानगर, वडगाव शेरी) असे त्याचे नाव असून, त्याच्या ताब्यात असलेली ॲक्टिवा ही समर्थ पोलीस स्टेशनमधील दाखल गुन्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास गुन्ह्यातील गाडीसह मिळून आल्याने त्यास सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार नितीन धोत्रे करीत आहेत.
आरोपीस अधिक विश्वासात घेऊन त्याच्याकडे तपास केला असता त्याने दोन महिन्यांपूर्वी सेव्हन लव्हज चौक, शंकरशेठ रोड, पुणे येथून हिरो होंडा स्प्लेंडर प्लस गाडी चोरी केल्याबाबत सांगितल्याने ती जप्त करण्यात आली आहे. सदर बाबत खडक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे. सदर कारवाईत नाकाबंदी व गस्त दरम्यान एकाच दिवशी एकूण तीन गुन्हे उघडकीस आले आहेत.
सदरची कामगिरी ही, अपर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे, पोलीस उप आयुक्त प्रियंका नारनवरे, सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णु ताम्हाणे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) उल्हास कदम यांच्या मार्गदर्शनानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप जोरे, पोलीस उपनिरीक्षक ज्योती कुटे, पोलीस हवालदार संतोष काळे, सुशील लोणकर, नितीन धोत्रे, सुभाष पिंगळे, सुभाष मोरे, हेमंत पेरणे, विठ्ठल चोरमले, शुभम देसाई, महेश जाधव, नीलेश साबळे, शांताराम तळपे, श्याम सूर्यवंशी यांनी केली आहे.
