गुन्हे शाखा युनिट १ची कामगिरी : आरोपी लोणीकाळभोर पोलिसांच्या ताब्यात
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : सात वर्षांपासून फरार वाँटेड गुन्हेगारास जेरबंद करण्यात गुन्हे शाखा युनिट १ ला यश मिळाले असून, त्यास पुढील कारवाईसाठी लोणीकाळभोर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले
आहे.
दि. २३ मे २०१४ रोजी वडकी येथे में पामोसा ट्रेड इंडीया प्रा. लिमिटेड गोडाऊनमध्ये राकेश मुरलीधर नायर व इतर यांनी सदर गोडाऊनमध्ये शेतीवरील खत विक्रीचा कोणताही परवाना नसताना स्वतःच्या खताचे पॅकेटवर बनावट नावाचे लिहिलेले लेबल लावून बोगस व अवैध सेंद्रिय खताचा ३,०१,३६५ रुपयांचा माल विक्रीकरता ठेवला म्हणून विभागीय कृषी सहसंचालक सुभाष पांडुरंग गावडे (कृषीभवन, शिवाजीनगर, पुणे) यांनी आरोपी राकेश मुरलीधर नायर व त्याच्या इतर साथीदारांवर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. त्यापैकी काही आरोपी दाखल गुन्ह्यांत अटक करण्यात आले होते. सदर गुन्ह्यात आरोपी विजय पवार हा गुन्हा दाखल झाल्यापासून सुमारे सात वर्षांपासून फरार होता.
यातील फरार आरोपी हा आपले अस्तित्व लपवून आयुष्य जगत असल्याबाबत पोलीस अंमलदार अमोल पवार यांनी गुप्त बातमीदारांकडून माहिती मिळवून तांत्रिक विश्लेषण करून तो बावधन येथे नेहमी येत असल्याचे दिसून आल्याने तेथे पाळत ठेवून सापळा लावला. सदर गुन्ह्यात सातवर्षापासून फरार असलेला आरोपी विजय पवार हा त्याच्या पत्नीला भेटण्यासाठी बावधन येथे येणार आहे, अशी खात्रीशिर बातमी मिळाल्याने त्याबाबत वरिष्ठांना माहिती देऊन त्यांच्या परवानगीने युनिट-१, गुन्हे शाखा पुणे शहर पथकाकडील स्टाफसह बातमीप्रमाणे जाऊन नमुद आरोपीस ताब्यात घेऊन नाव पत्ता विचारता त्याने त्याचे विजय जगन्नाथ पवार (वय ४५, रा. बावधन, पुणे) असे असल्याचे सांगितले. त्याचेकडे लोणीकाळभोर पोलीस स्टेशनकडील वरील दाखल गुन्ह्याचे अनुषंगाने त्यास विश्वासात घेऊन तपास करता त्याने दाखल गुन्ह्यात सहभागी असल्याचे कबूल केल्याने आरोपीस पुढील कारवाईकामी लोणीकाळभोर पोलीस स्टेशन, पुणे यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता पोलीस, सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) रामनाथ पोकळे, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) श्रीनिवास घाडगे, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे- १/२) लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदशनाखाली युनिट-१, गुन्हे शाखा पुणे शहरचे पोलीस निरीक्षक शैलेश संखे, पोलीस अंमलदार अमोल पवार, अजय थोरात, इम्रान शेख, आय्याज दड्डीकर, तुषार माळवदकर,
महेश बामगुडे, मिना पिंजण यांनी केली आहे.
