गुन्हे शाखेच्या युनिट पाच पथकाची जोशपूर्ण कामगिरी : स्पोर्ट्स बाईकसह आठ लाखांचा मुद्देमाल जप्त
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे शहरातील महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी चोऱ्या करणाऱ्या दोघा आरोपींना जेरबंद करण्यात गुन्हे शाखेच्या युनिट पाच पथकाला मोठे यश प्राप्त झाले असून, याप्रकरणी एका स्पोर्ट्स बाईकसह सात मंगळसूत्रे अशा आठ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
युनिट-०५ गुन्हे शाखेच्या पथकाने हडपसर, कोंढवा, वानवडी परिसरामध्ये घडलेल्या चेन स्नेचिंगच्या गुन्ह्याचा तपास करताना, गुन्हा घडलेल्या ठिकाणांपासून सतत सात दिवस कोंढवा, हांडेवाडी, हडपसर, मांजरी, लोणी काळभोर, सोरतापवाडीफाटा, ऊरळीकांचन, शैदवणेफाटा, बाधापुर, सासवड, जेजुरी, मोरगाव आणि बारामती असे १५० कि.मी. अंतरात जवळपास ५५० सी.सी.टि.व्ही फुटेज चेक केले. तसेच या भागातील सी.सी.टि. व्ही. फुटेजच्या आधारे तांत्रिक विश्लेषण केले.
सदर सी. सी. टि. व्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणांचे आधारे पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ शेंडगे व युनिट ५ कडील स्टाफला प्राप्त झालेल्या बातमीवरून सदर गुन्ह्यातील आरोपी विनोद गोविंद पिंपळे (वय २८, रा. मंजुळा अपार्टमेंट प्लॅट नं. ६, जेल रोड, नाशिक) आणि आरोपी सुरेश भिमा काळे (वय ३१, रा. संगमनेर रोड, श्रीरामपूर) यांना पकडले. सदर आरोपींकडे कौशल्यपूर्ण तपास करून पुणे शहरातील महिलांचे गळ्यातील चैन चोरीचे एकूण सात गुन्हे उघडकीस आणले आहेत. सदरहू सात गुन्ह्यांमध्ये आरोपीकडून एकूण १५२ ग्रॅम वजनाची सात मंगळसूत्रे व गुन्हा करताना वापरलेले होन्डा ऑरनेट स्पोर्ट्स बाईक मोटार सायकल असा एकूण ७,९९,००० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. सदरहू आरोपी हे गुन्हा करण्यासाठी नाशिक व नगर येथून स्पोर्ट्स बाईक वापरून वेगवान पद्धतीने पुणे शहरात येऊन चैन चोरीचे गुन्हे करून लागलीच पळून जात होते. सदर आरोपी याचेकडून सात गुन्हे उघडकीस आलेले आहेत.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) रामनाथ पोकळे, पोलीस उपआयुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, सहायक पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे, पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ शेंडगे, पोलीस अंमलदार रमेश साबळे, दया शेगर, महेश वाघमारे, प्रमोद टिळेकर, विनोद शिवले, अकबर शेख, आश्रुबा मोराळे, चेतन चव्हाण, दीपक लांडगे, विशाल मिलारे, विलास खंदारे, पृथ्वीराज पांडोळे, प्रवीण काळभोर, दाऊद सय्यद, अजय गायकवाड, दत्ता टोबरे, अमर उगले, संजयकुमार दळवी, स्नेहल जाधव, स्वाती गावडे यांनी केलेली आहे.
