गुन्हे शाखा युनिट एकची कामगिरी : अनेकांची फसवणूक केल्याचे उघड
महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे शहरातील सुप्रसिधद्ध उद्योगपतीला व्यापारी संकुलात मोफत ऑफीस किंवा ५० लाख रुपये खंडणी मागणाऱ्या दोघांना गजाआड करण्यास गुन्हे शाखा युनिट एकला यश मिळाले असून, अशाप्रकारे अनेकांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे.
डिसेंबर २०१९ ते १६ सप्टेंबर २०२१ या दरम्यान आरोपी राजेश ऊर्फ बॉबी खैरातीलाल बजाज ऊर्फ सचदेव (रा. अंकुर सोसायटी, फ्लैट नं.१, कमला नेहरू पार्क समोर शिवाजीनगर, पुणे ) आणि बापु गोरख शिंदे ( रा. नऱ्हे रोड, मानाजीनगर, नगर, पुणे) यांनी आपसात संगनमत करून यातील आरोपी बापु शिंदे याने पुणे शहरातील सुप्रसिद्ध उद्योगपतीची पुणे महानगरपालीका या ठिकाणी भेट घेऊन त्यांनी वानवडी येथे “९३ एव्हेन्यु” या व्यावसायिक प्रकल्पातील एक ऑफीस मोफत द्या किंवा रोख पन्नास लाख रुपये द्यावे लागतील, अशी खंडणीची मागणी करून न दिल्यास वानवडी येथील बांधलेल्या प्रकल्प हा बेकायदा बांधलेला आहे.
या बाबत पोलीसांत वा इतर ठिकाणी तक्रार करून तुमची बदनामी करून वाट लावून टाकीन, तुम्हास कधी संपवून टाकेन हे कळणार पण नाही, अशी धमकी दिली, तसेच आरोपी राजेश ऊर्फ बॉबी खैरातीलाल बजाज याने वकील नसतानाही व त्याच्याकडे वकिलीची सनद नसताना त्याने त्याचे वकीलपत्र सिव्हिल कोर्ट. पी. एम. सी. येथील कोर्टात सादर करून वकील म्हणून काम करून वकील असल्याबाबतचे बनावट ओळखपत्र दाखवून फिर्यादी यांचा विश्वासघात करून त्यांच्याकडून वकील फी म्हणून अकरा लाख रुपये इतकी रक्कम घेऊन फसवणूक करून तसेच पिंपळे सौदागर येथील घेतलेल्या फ्लॅटची पूर्ण रक्कम न देता काहीएक न सांगता फ्लॅटचा ताबा पावती (पजेशन लेटर) न घेता जबरदस्तीने फ्लॅटचा ताबा घेऊन घराविषयी आगळीक केली म्हणून दिनांक २० सप्टॆंबर २०२१ रोजी तक्रार दिल्याने नमुद आरोपी यांच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल झाल्यापासून दोन्ही आरोपी परागंदा होऊन आपले अस्तीत्व लपवित होते. दोन्ही आरोपींना 2९ ऑक्टोबर रोजी जेरबंद करून नमुद गुन्ह्यात अटक करण्यात आलेले आहे.
आरोपी राजेश ऊर्फ बॉबी खैरातीलाल बजाज ऊर्फ सचदेव याचे विरुध्द डेक्कन, शिवाजीनगर, कोरेगाव पार्क चतुश्रृंगी पोलीस ठाणेस फसवणुक करणे, खंडणी मागणे, कौटुंबिक अत्याचार करणे इत्यादी पाच गुन्हे दाखल असून मुंबई न्यायालय, व पुणे न्यायालयात फसवणूक करून वकिली केलेबाबतचे दोन दावे दाखल आहेत. तसेच आरोपी बापू गोरख शिंदे याचेविरुद्ध बंडगार्डन, शिवाजीनगर, चतुःश्रुंगी पोलीस ठाणे येथे जुगार चालविणे, दारू पिऊन वाहन चालविणे, खंडणी मागणे इत्यादी पाच गुन्हे दाखल आहेत. नमुद आरोपी यांना दिनांक ३० ऑक्टोबर रोजी न्यायालयात हजर केले असता, त्यांना ०१ नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी मंजुर केलेली आहे. पुढील तपास वरीष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे हे करीत आहेत.
सदरची कामगिरी ही, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) रामनाथ पोकळे, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे १) पुणे शहर लक्ष्मण बोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट-१ कडील वरीष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे, पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड, सुनील कुलकर्णी, पोलीस अंमलदार सतीश भालेकर, महेश बामगुडे, अशोक माने, राहुल मखरे, शशिकांत दरेकर, दत्ता सोनावणे, तुषार माळवदकर यांनी केली आहे.
