खडकी पोलीस स्टेशनमध्ये ६ जणांवर गुन्हा : महादेववाडी येथे घडला प्रकार
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : ‘तू माझ्या दोस्तला मारले आता तुला खलास करतो’, असे म्हणून तरुणावर लोखंडी रॉडने मारहाण करुन त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्या ६ जणांवर खडकी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार महादेववाडी येथे रविवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास घडला.
याप्रकरणी विरु हरीदास केंगार (वय १९, रा. राजीव गांधीनगर, खडकी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी मलंग, शहजाद, मेहबुब व त्यांच्या इतर तीन साथीदारांवर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी रविवारी रात्री पावणेदहा वाजता महादेववाडी येथून जात असताना मोटारसायकलवरुन आरोपी आले. त्यांनी फिर्यादी यांना शिवीगाळ केली. मलंग याने ‘‘मै इधर का भाई है, मलंगभाई, तू मेरे दोस्त अरबाज को मारा ना अभी तेरे को मै खलास करता, तु देख’’ असे म्हणून लोखंडी रॉडने डोक्यात, पायावर, हातावर मारुन जखमी केले. त्याच्याकडील मोबाईल जबरदस्तीने चोरला. गाडीवर बसवून पुन्हा मारहाण केली.
सहायक पोलीस निरीक्षक कदम पुढील तपास करीत आहेत.
