गुन्हे शाखेंतर्गत संयुक्त कारवाई : एक लाख पाच हजार १४० रुपयांचा ऐवज जप्त
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : परराज्यातून गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना जेरबंद करून एक लाख पाच हजार १४० रुपयांचा ऐवज जप्त केला. गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थविरोधी पथक-१ आणि दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-१ यांनी संयुक्तपणे कारवाई केली.
ब्रजेंद्रकुमार राजेंद्रकुमार त्रिपाठी (वय २९), शिवकुमार लवलेश त्रिपाठी (वय १९, दोघे रा. भरबौल, ता. करवी, जि. चित्रकुट, उत्तर प्रदेश) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. आऱोपींविरोधी शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये एनडीपीएस ॲक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे.
गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थविरोधी पथक-१ व दरोडा व वाहनचोरी पथक-१चे पोलीस अधिकारी-कर्मचारी संयुक्तपणे शिवाजीनगर, चतुश्रुंगी, खडकी पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रामध्ये गस्त घालीत होते. त्यावेळी कृषी विद्यापीठ चौक येथील कै. रावसाहेब मोहनलाल चिमनलाल मणियार ट्रस्ट बिल्डिंग, जुने होमगार्ड कार्यालयासमोरील सार्वजनिक रोडवर दोन व्यक्तींकडे गांजा असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे अधिक तपास केला असता ८५ हजार १४० रुपयांचा (चार किलो २५७ ग्रॅम) गांजा आणि दोन मोबाईल २० हजार रुपये असा एकूण एक लाख पाच हजार १४० रुपयांचा ऐवज जप्त केला.
पोलीस उपायुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थविरोधी पथक-१चे पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, पोलीस हवालदार मनोज साळुंके, विशाल दळवी, संदीप जाधव, पांडुरंग पवार, विशाल शिंदे, नितेश जाधव, योगेश मोहिते व दरोडा वाहनचोरी विरोधी पथक-१चे पोलीस निरीक्षक अनिल शेवाळे, सहायक पोलीस उपनिरीक्षक एस. वाय. शेख, पोलीस हवालदार निलेश शिवतरे, पोलीस शिपाई एस. एस. दगडे, एच.एस. कोळप, जी. पी. पाटोळे यांच्या पथकाने संयुक्त कारवाई केली.
