लोहमार्ग पोलिसांची कामगिरी : आठ किलो गांजा जप्त
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात गांजा जप्त करण्यात येत आहे. दौंड (जि. पुणे) येथे लोहमार्ग पोलिसांनी कारवाई करत 8 किलो गांजा जप्त केला असून, दोघांना बेड्या ठोकल्या. ही कारवाई दौंड लोहमार्ग पोलिसांनी भुवनेश्वर-मुंबई कोणार्क एक्सप्रेसमध्ये शुक्रवारी (दि. 12) केल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक युवराज कलकुटगे यांनी दिली.
चित्तरंजन मांझी व पपुन रामचंद्र प्रधान (दोघे रा. धनंजयापुर, गंजाम, ओडिशा) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी सांगितले की, कुर्डूवाडी रेल्वे स्थानकावरुन शुक्रवारी रात्री कोणार्क एक्सप्रेस दौंडच्या दिशेने रवाना झाल्यावर बी-6 डब्यातील दोन प्रवाशांच्या हालचाली संशयास्पद वाटल्या.
गस्तीवरील रेल्वे सुरक्षा दलाचे हवालदार जवळकोटे यांनी नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून याची माहिती दिली. त्यानंतर कोणार्क एक्सप्रेस दौंड रेल्वे स्थानकावर आल्यानंतर बी-6 डब्यातील प्रवाशांची लोहमार्ग पोलीस आणि दौंड रेल्वे सुरक्षा दल पोलिसांकडून आली. या झडतीत दोघांकडे 8 किलो गांजा आढळून आला. रेल्वे सुरक्षा दलाचे निरीक्षक तेजप्रकाश पाल, लोहमार्ग पोलीस दलाचे फौजदार ताराचंद सुडगे, रेल्वे सुरक्षा दलाचे सहायक फौजदार गुजर व मीना यांनी दोघांना ताब्यात घेतले. हा गुन्हा कुर्डुवाडी हद्दीत घडला असल्याने दौंड लोहमार्ग पोलिसांनी गुन्ह्याची नोंद करुन पुढील तपासाकरीता कुर्डूवाडी लोहमार्ग पोलिसांकडे वर्ग केला आहे.
