सांगोला पोलिसांची कामगिरी : मालकाच्या नातेवाईकानेच टीप दिल्याचे तपासात उघड
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : अपघाताचा बनाव करून लुटणाऱ्या दरोडेखोरांच्या ४८ तासांत पोलिसांनी मुसक्या आवळल्या. आरोपीकडून ९२५ ग्रॅम, ५६० मिली ग्रॅम वजनाचे सोन्याचे बिस्कटसह ४५ लाख ५२२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. गुन्ह्यातील आरोपींना मालकाच्या नातेवाईकांनीच टीप दिल्याचे तपासात निष्पन्न झाले.
पोलिसांनी सांगितले की, सुशांत बापूसो वाघमारे (वय २२, रा. दिघंची, ता. आटपाडी, जि. सांगली) यांना विजय काटकर यांनी बोलावून शुद्ध सोने करून बिस्कीट बनवून देण्यास सांगितले. सोने वितळवून बिस्कीट बनवून परत देण्यासाठी जात असताना पाठीमागून आलेल्या कारची धडक लागून अपघात झाला. चारचाकी वाहनही चारीत पडले. त्यावेळी सोन्याची बिस्कीट काढून घेऊन फरार झाले.
सदर प्रकरणाचा सांगोला पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. त्याअनुषंगाने पोलिसांनी तपास सुरू केला. या गुन्ह्यातील आरोपी फिर्यादीचा मित्र असल्याची माहिती मिळाली. गुन्ह्यातील संशयित मिरज शहरातील वाईनशॉपजवळ थांबल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सापळा रचून संशयिताला ताब्यात घेतले. आरोपींकडे तपास केला असता, त्यांनी सांगितले की, शेअर मार्केटमध्ये तोटा झाल्याने कर्जबाजारी झालो, त्यामुळे मित्राच्या मदतीने गुन्हा केल्याची कबुली दिली. पुढील तपास सांगोला पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नागेश यमगर पुढील तपास करीत आहेत.
पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधिक्षक हिंमत जाधव, मंगळवेढा उपविभाग उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील, सांगोला पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सुहास जगताप यांच्या नेतृत्वाखाली सांगोला पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक नागेश यमगर, गुन्हे शाखेचे सहायक फौजदार ख्वाजा मुजावर, श्रीकांत गायकवाड, पोलीस अंमलदार नारायण गोलेकर, मोहन मनसावाले, समीर शेख, राहुल देवकाते, राहुल कोरे, सायबर पोलीस ठाण्याचे अन्वर अत्तार यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
