आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

येरवड्यातील ज्येष्ठ महिलेस साडीचा मोह पडला महागात

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • November 15, 2021
Spread the love

६२ वर्षीय महिलेने दिली फिर्याद : १० ग्रॅम वजनाची सोन्याची पोत केली लंपास

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : एका बड्या व्यापार्‍यास मुलगा झाला आहे. तो साडी व पैसे भेट देणार असल्याचे सांगणार्‍या दोघा चोरट्यांच्या जाळ्यात अडकलेल्या ज्येष्ठ नागरिक महिलेला हा मोह चांगलाच महागात पडला. चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याची पोत लांबविली. शनिवारी (दि. १३ नोव्हेंबर २०२१) दुपारी ही घटना घडली.

याप्रकरणी येरवड्यातील गणेशनगरमध्ये राहणार्‍या ६२ वर्षाच्या महिलेने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी या शनिवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास चित्रा टॉकीज चौकातून जात होत्या. त्यावेळी दोघा चोरट्यांनी त्यांना बड्या व्यापार्‍यास मुलगा झाला आहे व तो साडी व पैसे भेट देणार आहे, असे सांगितले. त्यांना बरोबर चलण्यास सांगितले.

काही अंतर गेल्यावर त्यांनी फिर्यादी यांना अंगावर सोन्याचे दागिने पाहून भेट देणार नाही, तुम्ही गळ्यातील पोत काढून पिशवीत ठेवा असे सांगितले. त्यानुसार त्यांनी गळ्यातील १० ग्रॅम वजनाची ३० हजार रुपयांची सोन्याची पोत काढली. ती फळाचे पिशवीत ठेवत असताना त्यांना मदत करण्याचा बहाणा करुन त्यांना बोलण्यात गुंतवून हातचलाखीने ही पोत काढून घेऊन ते निघून गेले. पोलीस उपनिरीक्षक डोंबाळे तपास करीत आहेत.