आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

कात्रज परिसरातील 4 सोसायटयांमधील फ्लॅट फोडले

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • December 9, 2021
Spread the love

भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा : ९७ हजार रुपयांचा ऐवज केला लंपास

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, कात्रज परिसरातील चार सोसायट्यांमधील फ्लॅट फोडून लाखो रुपयांचा ऐवज लंपास केल्याचे समोर आले आहे. पुण्यातील कात्रज येथील वंडर सिटीमधील फ्लॅट फोडून चोरट्यांनी 97 हजारांचा ऐवज लंपास केला. याच परिसरातील आणखी तीन सोसायट्यांमध्ये चोरट्यांनी चोरी केली. मात्र, त्यांच्या हाती काहीच लागले नाही. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिलिंद साठे (वय-58 रा. आनंदनगर, सिंहगड रस्ता) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार कारमधून आलेल्या चोरट्यांच्या विरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 4 डिसेंबर रोजी पहाटे तीनच्या सुमारास ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कात्रज परिसरात वंडर सिटी सोसायटीतील ‘जे’ इमारतीत साठे यांचा फ्लॅट आहे. या ठिकाणी त्यांची आई राहते. सध्या हा फ्लॅट बंद आहे. 4 डिसेंबर रोजी पहाटे तीनच्या सुमारास चोरटे मोटारीतून सोसायटीत शिरले. त्यांनी साठे यांच्या आईच्या फ्लॅटचा सेफ्टी दरवाजा उचकटून आत प्रवेश केला. कपाटातील 17 हजारांची रोकड, दागिने असा 97 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. दुसऱ्या दिवशी साठे यांना या घटनेबाबत समजले. त्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पाहणी केली.

वंडर सिटी बरोबर या परिसरातील सुनीता रेसीडेन्सी, तोरणा सोसायटी मधील प्रत्येकी दोन फ्लॅटचे कुलूप तोडून घरफोडी करण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला. या सोसायट्यांमधील घरफोड्यांत चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही. तर करण भारती सोसायटीत एका गाडीचे चोरट्यांनी नुकसान केले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक धीरज गुप्ता करीत आहेत.

गुन्ह्यात वापरलेली कार चोरीची…

वंडर सिटी आणि इतर तीन सोसायट्यांमध्ये घरफोडी करण्यासाठी चोरटे एका कारमधून आले होते. वंडर सिटीच्या सीसीटीव्हीत दिसत आहे. गुन्ह्यात वापरलेली कार चोरीची असून ती तीन दिवसांपूर्वी निगडीतून चोरल्याचे निष्पन्न झाले आहे. चोरट्यांनी ओळख लपवण्यासाठी मास्क घातल्याचे स्पष्ट दिसत आहे. गाडीत दोन किंवा तीन चोरटे असण्याची शक्यता आहे.