स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा : गुन्हे शाखेच्या युनिट-१ने केली कारवाई
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : हातात तलवार घेऊन फोटो काढून सोशल मीडियावर व्हायरल करीत दहशत पसरविणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या. गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाने महर्षिनगर मंडळाजवळील सार्वजनिक रोडवर कारवाई केली.
राहुल ऊर्फ ऋतिक चंद्रकांत जगताप (वय २१, रा. झांबरे पॅलेस, महर्षिनगर, स्वारगेट) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याच्यावर स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, गुन्हे शाखेच्या युनिट-१चे पथक खडक पोलीस स्टेशन हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी हातात तलवार घेऊन सोशल मीडियावर दहशत पसरविणारा आरोपी महर्षिनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाजवळ थांबल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सापळा रचून संशयावरून आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक तपास केला असता, त्याच्याकडे एक हजार रुपयाची तलवार मिळून आली. तलवार हातात घेऊन सोशल मीडियावर फोटो व्हायरल करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे तपासात उघडकीस आले. त्याच्यावर स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या युनिट-१चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे, पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड, सुनील कुलकर्णी, पोलीस अंमलदार अमोल पवार, सतीश भालेकर, महेश बामगुडे, इम्रान शेख, अय्याज दड्डीकर, तुषार माळवदकर, मीना पिंजण यांच्या पथकाने ही कारवाई केली.
