हडपसर पोलिसांत फिर्याद दाखल : मांजरी बुद्रुक येथील सटवाईनगरमध्ये घडली घटना
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : किरकोळ वादातून मारहाण करणाऱ्या पाचजणांना अटक केली असून, चार विधिसंघर्षित बालकांना ताब्यात घेण्यात आले आहे. मांजरी बुद्रुक येथील सटवाईमंदिरापुढे सटवाईनगरमध्ये ११ डिसेंबर २०२१ रोजी रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली होती.
अक्षय शंकर कोलकर (वय २४, रा. सटवाईनगर, मांजरी बु।, ता. हवेली, जि. पुणे), राकेश देविदास थोरात (वय २०), मंगेश देविदास थोरात (वय २२, दोघे रा. घरकुल मांजराई मंदिराजवळ, मांजरी, पुणे), प्रदीप गल्लपा महीर (वय २३), शंतनू संतोष गायकवाड (वय २०, रा. सटवाईनगर, मांजरी बु।, पुणे) यांना अटक केली असून, चार विधसंघर्षित बालकांना ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी मोनिका चौगुले (वय २३, रा. मांजरी बु।, पुणे) यांनी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, फिर्यादीचा भाऊ सौरभ नेटके आणि तानाजी भोसले यांचा किरकोळ वाद झाला होता. त्या रागातून आरोपींनी गौरव नेटके याच्या डोक्यात कोयत्याने वार करत दगड, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. आरडाओरडा करीत परिसरातील वस्तीमध्ये दहशत निर्माण करून भीतीचे वातावरण निर्माण केले. पुढील तपास हडपसर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे करीत आहेत.
