आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

आरोपी सॅन्डी उर्फ संदीप चव्हाणला जामीन मंजूर

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • December 30, 2021
Spread the love

श्याम सोनटक्के खून प्रकरण : वकील सुधीर तानाजीराव पाटील यांची माहिती

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : सिंहगड रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत शाम हिराचंद्र सोनटक्के याचा निर्घृण खून करण्यात आला होता. खूनाच्या आरोपाखाली न्यायालयीन कोठडीत असलेला आरोपी सॅन्डी उर्फ संदीप नरसिंह चव्हाण याचा अतिरिक्त सत्र न्यायाधीश सुनील वेदपाठक यांच्या न्यायालयाने जामीन मंजूर केला असल्याची माहिती आरोपीचे वकील अ‍ॅड. सुधीर तानाजीराव पाटील यांनी दिली.

शाम सोनटक्के याचा 5 मे 2021 रोजी निर्घृण खून करण्यात आला होता. याप्रकरणी आरोपी संदीप चव्हाण याच्यासह 16 आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी संदीप चव्हाण याने अ‍ॅड. पाटील यांच्यामार्फत अतिरिक्त सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. आरोपीच्या जामीन अर्जावर न्यायालयात सुनावणी झाली. अ‍ॅड. पाटील आणि सरकारी वकिलांचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने आरोपीचा जामीन अर्ज मंजूर केला.

अ‍ॅड. सुधीर पाटील यांनी सत्र न्यायालयापुढे युक्तिवाद केला की, आरोपीच्या विरोधात कोणताही सबळ पुरावा नाही. तपास यंत्रणांनी गोळा केलेल्या पुराव्यांची साखळी ही सकृतदर्शनी आरोपींनी गुन्हा केला आहे, असे सिद्ध होत नाही. त्याचबरोबर शाम सोनटक्के याचा मृत्यु दुर्देवी होता, परंतु आरोपी व शाम सोनटक्के यांच्यामध्ये कुठलेही वैमनस्य नव्हते. तसेच त्याला मारण्याचा कुठलाही हेतू आरोपीकडे नव्हता. जिल्हा सरकारी वकील पाटील यांनी कोर्टापुढे युक्तिवाद केला की, आरोपीने केलेला गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असून त्याच्या विरुद्ध सबळ पुरावा आहे. तसेच अशा गंभीर स्वरुपाच्या गुन्हयात आरोपींना जामिन दिल्यास ते सरकारी साक्षीदारांवर दबाव आणतील. त्यामुळे त्यांचा जामीन नामंजूर करण्यात यावा.

दरम्यान, अ‍ॅड. सुधीर पाटील म्हणाले की, संपुर्ण खटल्यातील कोणताच प्रत्यक्षदर्शनी साक्षीदार हा आरोपीच्या भूमिकेचे वर्णन करीत नाही. त्याचप्रमाणे फिर्यादीचा पुरवणी जबाब हा प्रत्यक्ष गुन्हा घडल्यानंतर दोन दिवसांनी नोंदवला आहे. त्यामुळे पुरवणी जबाबाला जामिन देताना योग्य वजन देता येणार नाही, हे विविध उच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे सादर करुन अ‍ॅड. सुधीर पाटील यांनी आपले म्हणणे न्यायालयापुढे मांडले. तसेच कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले की, तपास यंत्रणेने केलेल्या तपासात पुराव्याच्या साखळ्या सिद्ध होत नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत आरोपी संदीप चव्हाण याने कटकारस्थान करुन खून केल्याप्रकरणी त्याला जामिन नाकारता येणार नाही. अतिरिक्त सत्र न्यायाधीश सुनील वेदपाठक यांच्या न्यायालयाने युक्तिवाद ग्राह्य धरुन आरोपी संदीप नरसिंग चव्हाण याची जामिनावर मुक्तता केली.