आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

मुलीवर अत्याचार करणाऱ्यास १० वर्षे सक्तमजुरी

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • December 30, 2021
Spread the love

कोंढव्यात दाखल होता गुन्हा : सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशांनी दिला निकाल

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : माझे तुझ्यावर प्रेम आहे असे सांगून बहिणीच्या घरी नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या तरुणाला न्यायालयाने 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. तसेच 68 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. पुणे सत्र न्यायालयाचे न्यायाधीश के.पी. नांदेडकर यांनी हा निकाल दिला. हा प्रकार पुण्यातील कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला होता.

अश्पाक सलीम बागवान (वय-28 रा. मिठानगर, कोंढवा) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलीने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. जून 2017 मध्ये हा प्रकार घडला होता. पीडित मुलगी शाळेत जात असताना आरोपी अश्पाक हा तिचा पाठलाग करीत होता. घटनेच्या दिवशी त्याने तिला माझे तुझ्यावर प्रेम आहे. तू मला अवडतेस. मला तुला काही सांगायचे आहे, असे तिला सांगितले. त्यानंतर पीडित मुलीला त्याच्या बहिणीच्या घरी नेले व त्याठिकाणी तिच्यावर अत्याचार केले. ही बाब कोणाला सांगितली तर तुला आणि तुझ्या घरच्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर आरोपीने पीडित मुलीला वेळोवेळी त्रास देऊ लागल्याने मुलीच्या आईने कोंढवा पोलिसांकडे तक्रार दिली.

या खटल्याचे कामकाज सरकारी वकील सुनील हांडे आणि अ‍ॅड. मिलिंद दातरंगे यांनी पाहिले. पोलीस हवालदार महेश जगताप आणि पोलीस नाईक अंकुश केंगले यांनी न्यायालयीन कामकाजात मदत केली. दंडाच्या रकमेपैकी 35 हजार रुपये मुलीला नुकसानभरपाई म्हणून देण्यात यावी. दंडाची रक्कम न भरल्यास चार महिने अतिरिक्त कारावास भोगावा लागणार असल्याचे निकालात नमूद केले आहे.