आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

विनापरवाना पिस्टल बाळगणाऱ्या सराईताला ठोकल्या बेड्या

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • December 30, 2021
Spread the love

गुन्हे शाखेच्या युनिट-१ची कारवाई : एक पिस्टल, एक जिवंत काडतूस जप्त

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : विनापरवाना व बेकायदेशीर पिस्टल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पुणे गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाने बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून देशी बनावटीचे एक पिस्टल आणि एक जिवंत काडतुस जप्त केले आहे. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई अप्पर इंदिरानगर येथे मंगळवारी (दि. २८ डिसेंबर २०२१) केली.

जतीन संतोष पवार (वय १९ रा. धायरीगांव, धायरेश्वर मंदिर, खंडाळे-पोकळे कॉर्नर सोसायटी, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार दत्ता सोनवणे यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखा युनिट-१चे पोलीस अधिकारी कर्मचारी हद्दीत पेट्रोलिंग करत असताना जतीन पवार हा सराईत गुन्हेगार चैत्रबन आरोग्य कोटीसमोर उभा असून त्याच्याकडे पिस्टल असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार पोलिसांनी अप्पर इंदिरानगर येथे सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक गावठी बनावटीचे पिस्टल, मॅगझीन सापडली. मॅगझीन काढून पाहिली असता त्यामध्ये एक जिवंत काडतुस होते. पोलिसांनी आरोपीकडून पिस्टल आणि काडतुस असा एकूण ६१ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीवर दरोडा, खुनाचा प्रयत्न, मारामारी असे ६ गुन्हे दाखल आहेत.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे-१ गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शैलेश संखे,
पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड, सुनिल कुलकर्णी, पोलीस अंमलदार दत्ता सोनवणे, अनिकेत बाबर, राहुल मखरे, शशिकांत दरेकर, सतिश भालेकर, अशोक माने, अय्याज दड्डीकर, इम्रान शेख, अमोन पवार, अजय थोरात, महेश बामगुडे यांच्या पथकाने ही दमदार कामगिरी केली.