आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

एटीएम मशिन देण्याच्या बहाण्याने फसविणाऱ्या तिघांवर गुन्हा

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • January 6, 2022
Spread the love

भारती विद्यापीठ पोलिसांत फिर्याद : आंबेगाव पठार येथे २७ जुलै ते २८ ऑगस्ट दरम्यान घडला प्रकार

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : मालकीच्या गाळ्यात एटीएम मशिन बसवण्याच्या बहाण्याने एका व्यक्तीची 1 लाख 38 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. याप्रकरणी परराज्यातील दोन महिलांसह तीन जणांवर पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 27 जुलै ते 28 ऑगस्ट 2021 या कालावधीत आंबेगाव पठार येथे घडला आहे.

प्रिया चौधरी (रा. गाझीयाबाद, उत्तर प्रदेश), सपना कुमारी, अनुज सिंह यांच्या विरुद्ध फसवणूक आणि आयटी ॲक्टअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी राजेंद्र गंगाराम पाध्ये (वय 51 रा. राजे चौक, आंबेगाव पठार) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी सांगितले की, राजेंद्र पाध्ये यांचे आंबेगाव पठार येथे स्वत:च्या मालकीचे गाळे आहेत. ते एटीएम सेंटर करीता भाड्याने देण्यासाठी गुगलवर सर्च करत होते. त्यावेळी त्यांना या नामांकित कंपनीची माहिती एका लिंकवर मिळाली. फिर्यादी यांनी त्यांची सर्व वैयक्तिक माहिती भरली. त्यानंतर आरोपींनी त्यांना फोन करुन कंपनीतून बोलत असल्याचे सांगून मेलवर कन्फरमेशन पत्र पाठवले.

आरोपींनी फिर्यादी यांना पुढील कार्यवाही करावी लागेल असे सांगून, रजिस्ट्रेशन फी, प्रोसेसिंग फीच्या नावाखाली 16 हजार 500 रुपये व रिफंडेबल डिपॉझिट, ॲग्रीमेंट, टीडीएस अशी वेगवेगळी कारणे दाखवून त्यांना आणखी पैसे भरण्यास सांगून त्यांना 1 लाख 38 हजार रुपये भरण्यास भाग पाडले. मात्र, त्यानंतर एटीएम मशिन देखील मिळाली नाही. त्यावरुन आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यावरुन त्यांनी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.