वानवडी पोलिसांत फिर्याद : लग्नात दागिने कमी वजनाचे दिल्याने केला जात होता छळ
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : वानवडी परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीच्या आठव्या मजल्यावरून उडी मारुन एका विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (दि.11) दुपारच्या सुमारास घडली.
कल्याणी अजितकुमार प्रधान (वय-32 रा. फ्लॅट नं.806 बिल्डींग ड्रीम्स आकृती सोसा. काळेपडळ, हडपसर) असे आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव आहे. महिलेच्या आत्महत्या प्रकरणात सॉफ्टवेअर इंजीनियर पतीसह 5 जणांवर वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अजितकुमार अनंतचरण प्रधान, पद्मावती प्रधान, अनंतचरण प्रधान, अभिमन्यू प्रधान, ममता प्रधान (सर्व रा. फ्लॅट नं.806 बिल्डींग ड्रीम्स आकृती सोसा. काळेपडळ, हडपसर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत मयत कल्याणी प्रधान यांची बहिण पाबन किशोरचंद्र परिडा (वय-42 रा. मिर्जापूर, राज्य ओरीसा) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुलेट घेण्यासाठी पैसे दिले नाहीत. तसेच लग्नात दिलेले दागिने कमी वजनाचे भरल्याने पती अजितकुमार आणि त्याच्या घरच्यांनी कल्याणीला त्रास दिला. तसेच दागिने वाढवून आणण्यासाठी माहेरुन पेसे आणावेत यासाठी वारंवार शिवीगाळ करुन मारहाण केली. पती आणि सासरच्या जाचाला कंटाळून कल्याणीने इमारतीच्या 8 व्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. वानवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिपक लगड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वाडकर पुढील तपास करीत आहेत.
