हवेली पोलीस ठाण्यात फिर्याद : किरकटवाडीतील मुलीने घेतला टोकाचा निर्णय
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : आईच्या दुर्धर आजारामुळे तिचे हाल पाहवत नसल्याचे चिठ्ठीत लिहून माय-लेकींनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. ही घटना हवेली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील किरकटवाडी येथे मध्य रात्री दोनच्या सुमारास उघडकीस आल्याची माहिती हवेली पोलिसांनी दिली.
संगिता दत्तात्रय खपाले (वय-48) आणि मुलगी रेखा दत्तात्रय खपाले (वय-28) असे आत्महत्या करणाऱ्या माय-लेकींची नावे आहेत. आत्महत्या करण्यापूर्वी रेखा खपाले यांनी चिठ्ठी लिहून ठेवली असून पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.
पोलीस अधिकारी बाबर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत संगिता, रेखा आणि त्यांचा मुलगा हे सिंहगड रोडवरील किरकटवाडी येथे भाड्याच्या खोलीत राहतात. रेखा ही मजुरी करते. तर आई संगिता यांना मागील काही वर्षांपासून दुर्धर आजाराने ग्रासले आहे. घरातील परिस्थिती बेताची आहे. त्यांच्या मोठ्या मुलीचे लग्न झाले असून ती खडकवासला येथे राहण्यास आहे. आई आजारी असल्याने ती घरीच असायची. आईची ही अवस्था पाहवत नसल्याने रेखा आणि संगिता यांनी घरातील किचनमध्ये रात्री साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. रात्री दोनच्या सुमारास मुलगा पाणी पिण्यासाठी उठला असता त्याला किचनमधील लाईट सुरु असल्याचे दिसले. त्याने किचनमध्ये जाऊन पाहिले असता आई आणि बहिणीने गळफास घेतल्याचे दिसले. घटनेची माहिती मिळताच हवेली पोलीस ठाण्यातील पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. रेखा खपाले हिने आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली आहे. यामध्ये तिने आजारपणामुळे होणारे आईचे हाल आता पाहवत नाहीत. आमच्या आत्महत्येला कोणालाही जबाबदार धरु नये, पोलिसांनी घरच्यांना त्रास देऊ नये असे चिठ्ठीत लिहले आहे. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक मोहिते करीत आहेत.
