आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

कानाचा चावा, पातळ भाजी तोंडावर फेकून स्क्रू ड्रायव्हरने केले जखमी

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • January 15, 2022
Spread the love

भारती विद्यापीठ पोलिसांत गुन्हा : चार्जर दिला नाही म्हणून दोघा भावांची झाली मारामारी

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : मोबाईल हा आता सर्वांचा जीव की प्राण झाला आहे. मोबाईल जर बंद पडला तर लोक हैराण होतात. याच कारणावरुन दोघा भावांनी एका तरुणाच्या पाठीस व कानाचा चावा घेतला. त्याच्या तोंडावर जेवणातील पातळ भाजी टाकली. पाठीत स्क्रु ड्रायव्हरने मारुन जखमी केले. तसेच गॅरेजमधील गाड्या ढकलून देऊन त्यांचे नुकसान केले. या मागचे कारण ऐकून हैराण व्हाल. तरुणाने केवळ मोबाईल चार्जर दिला नाही, म्हणून दोघा भावांनी हे कृत्य केले.

चंद्रकांत रामदास माने (वय २२) आणि सूर्यकांत रामदास माने (वय २२, दोघे रा. भेंडी चौक, आंबेगाव) यांच्याविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी अंगद वसंतराव पांचाळ (वय ३४, रा. गारमाळ, धायरी) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना आंबेगाव बुद्रुकमधील गेअरअप अ‍ॅटो गॅरेजमध्ये १२ जानेवारी दुपारी साडेचार वाजता घडली.

पोलिसांनी सांगितले की, अंगद पांचाळ हे गेअरअप अ‍ॅटो गॅरेज येथे असताना चंद्रकांत माने याने त्यांच्याकडे मोबाईलचा चार्जर मागितला. पण पांचाळ यांनी चार्जर दिला नाही. यावरुन दोघा भावांनी त्यांच्याबरोबर भांडणे काढून त्यांच्या पाठीस व कानाचा चावा घेतला. त्यांच्या तोंडावर जेवणातील पातळ भाजी टाकली. गॅरेजमधील स्क्रू ड्रायव्हर घेऊन तो पांचाळ यांच्या पाठीत मारुन जखमी केले.

गॅरेजमधील गाड्या ढकलून देऊन त्यांचे नुकसान केले. सूर्यकांत माने याने दगड घेऊन अंगावर धावून आला व त्याने फिर्यादी व मालक आशय हेमंत जोशी यांना शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली. सहायक फौजदार चौधरी अधिक तपास करीत आहेत.