कोथरूड पोलिसांत फिर्याद : कोथरूडमधील नवभूमी गणपती मंदिराजवळ घडली घटना
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : तुला लय माज आलाय का, तुझा गेम केला पाहिजे, असे म्हणत कोयत्याने वार करून परिसरात दहशत पसरविणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना कोथरूडमधील नवभूमी गणपती मंदिराजवळील गल्लीत १६ जानेवारी २०२२ रोजी रात्री साडेआठच्या सुमारास घडली.
कोथरूडमधील १६ वर्षीय विधिसंघर्षित बालकाने कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, कोथरूडमधील नवभूमी मंदिराजवळील गल्लीपर्यंत फिर्यादी व त्याच्या मित्राचा पाठलाग करून तुला जास्त माज आलाय का, तुझा गेम केला पाहिजे, असे बोलत कानाखाली मारली. दरम्यान, दुसऱ्याने कोयत्याने मित्राच्या डोक्यावर आणि फिर्यादीच्या पाठीवर वार करून गंभीर जखमी केले. कोयत्याच्या धाकाने परिसरात दहशत निर्माण करून आरोपी पळून गेले.
कोथरूड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण कुलकर्णी पुढील तपास करीत आहेत.
