आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

चायनीज स्टॉलचालकाला धमकावणारे तडीपार गुंड जेरबंद

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • January 19, 2022
Spread the love

विमाननगर पोलिसांत फिर्याद : स्टॉल लगाना है तो दस हजार देना पडेगा

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : तडीपार असताना आपल्या साथीदारामार्फत चायनीज स्टॉलचालकाला धमकावून त्यांच्याकडून खंडणी वसुल करणाऱ्या दोघांना विमानतळ पोलिसांनी जेरबंद केले. “तुला स्टॉल चालवायचा असेल तर महिना १० हजार रुपये द्यावे लागेल,” अशी धमकी दिली. हा प्रकार विमाननगरमधील गणपती चौकात घडला.

शकील शब्बीर शेख (वय २३) आणि समीर शब्बीर शेख (वय २७, दोघे रा. लोहगाव) अशी त्यांची नावे आहेत. याबाबत टिंगरेनगर येथील एका २७ वर्षाच्या तरुणाने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, शकील आणि समीर शेख हे सराईत गुन्हेगार असून त्यांना येरवडा पोलिसांनी ऑगस्ट २०१९ मध्ये जबरी चोरीच्या गुन्ह्यात अटक केली होती. त्यांनी एका महिलेला धमकावून तिच्याकडील सोन्याचा नेकलेस जबरदस्तीने चोरुन नेला. त्यांच्याकडून ५ चोरीच्या दुचाकीही हस्तगत करण्यात आल्या होत्या. त्यांना पोलीस उपायुक्त परिमंडळ ४ यांनी तडीपार केले होते.

फिर्यादी हे विमाननगरमधील गणपती चौकात चायनीजची गाडी लावतात. फिर्यादी व त्यांचे कामगार चायनीज स्टॉलवर असताना ७ जानेवारी रोजी रात्री आठ वाजता शकील शेख तेथे आला. त्याने फिर्यादी यांना “आपको समीर भाईने बोला था ना चायनीज का स्टॉल चलाने का है तो महिने का दस हजार रुपये देना पडेगा ये ले समीर भाई से बात कर” असे म्हणून फोन लावून फिर्यादीकडे दिला. त्यावर समीर शेख याने “तुला स्टॉल चालवायचा असेल तर महिना १० हजार रुपये द्यावे लागेल,” अशी धमकी दिली. त्यावर फिर्यादी यांनी घाबरुन शकील शेख याला १२०० रुपये काढून दिले. तेव्हा त्याने दर महिन्याला पैसे दिले नाही तर स्टॉल चालवू देणार नाही, अशी धमकी दिली. या प्रकाराने घाबरुन फिर्यादी यांनी आजवर तक्रार दिली नव्हती. विमानतळ पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक जाधव अधिक तपास करीत आहेत.