खडकी पोलिसांत फिर्याद : कोयता हवेत फिरवत माजविली दहशत
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : तुला आईने दोन हजार रुपये दिले, ते परत दिले नाहीत, परत कसले पैसे मागतो असे म्हणाल्याने चिडून कोयत्याने वार करीत जखमी करणाऱ्यासह साथीदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना खडकीमधील गवळीवाडा वसाहत येथे २२ जानेवारी २०२२ रोजी साडेचारच्या सुमारास घडली.
अमित जगताप (वय २८, रा. खडकी, पुणे) यांनी खडकी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी भावाबरोबर मित्रासह खडकीतील गवळीवाडा वसाहत येथे थांबले होते. त्यावेळी आरोपीने फिर्यादीकडे पैसे मागितले, त्यावेळी तुला आईने दोन हजार रुपये दिले ते परत दिले नाहीत. पुन्हा पैसे का मागतो, असे म्हणल्याच्या कारणावरून चिडून आता आम्ही इथले भाई झालो आहोत. तुला माहीत नाही का, आता तुला आमची औकात दाखवतो, तुला खल्लास खरतो असे म्हणत कोयता डोक्यात मारून गंभीर जखमी केले. त्यावेळी फिर्यादीची पत्नी वाचविण्यासाठी मधे आली असता, तिलाही किरकोळ जखमी केले. यावेळी आरोपींनी कोयते हवेत फिरवत आम्ही इथले दादा आहोत, यांना सोडवायला कोणी आले, तर तुम्हालाही खलास करू, असे म्हणून परिसरात दहशत निर्माण केली. खडकी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक अमर कदम पुढील तपास करीत आहेत.