चतुश्रुंगी पोलिसांत फिर्याद : पांडवनगरमधील गुंजाळवाडी रोडवर घडली घटना
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : तुला लय माज आलाय का, आता जीवंत सोडणार नाही, असे म्हणत कोयत्याने वार करणाऱ्या पाचजणांना अटक केली असून दोन फरारींचा पोलीस तपास करीत आहेत. पांडवनगरमधील उत्तरादेवी जीमसमोर गुंजाळवाडी रस्त्यावर २४ जानेवारी २०२२ रोजी रात्री पावणेनऊच्या सुमारास ही घटना घडली.
विजय चंद्रकांत विटकर (वय १९), मयूर सुनील विटकर (वय २१), अतुल अनिल धोत्रे (वय २३), सागर विनायक मंगळवेढेकर (वय २२), प्रणव अर्जुन झडपे (वय १९, सर्व रा. वडारवाडी, पुणे) असे अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी अली शेख (वय २३, रा. जुनी वडारवाडी, पांडवनगर, पुणे) यांनी चतुश्रुंगी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, फिर्यादीचा भाऊ सलीम जावेद शेख (वय २०, मंजाळकर चौक, जुनी वडारवाडी, पांडवनगर) हा शुभम दुबळे, मानव शेलार यांच्यासमवेत उत्तरादेवी जीमसमोर पांडवनगर येथे शेकोटी करून गप्पा मारत होते. त्यावेळी आरोपींनी सलीम शेख याचा शर्ट पकडून शिवीगाळ करीत तुला लय माज आलाय का, तुला आता मी जीवंतच सोडणार नाही, असे म्हणून लोखंडी कोयत्याने डोक्यात वार करून गंभीर जखमी केले. यावेळी इतर आरोपींनी लोखंडी रॉडने मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, शुभम दुबळे भांडण सोडविण्यासाठी गेला असता, त्यालाही शिवीगाळ व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून ढकलून दिले. यावेळी आरोपींनी हातातील कोयता आमच्या दिशेने फिरवून आमच्या भांडणामध्ये पडला, तर कोणाला जीवंत सोडणार नाही, अशी धमकी देत आरडाओरडा करून शिवीगाळ करीत परिसरात दहशत पसरविली. चतुश्रुंगी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक एस. डी. पवार पुढील तपास करीत आहेत.
