हिंजवडी पोलिसांची कामगिरी : न्यायालयाने सुनावला १८ महिन्यांचा कारावास
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : हिंजवडीमधील आरोपी समीर जाधवने महिलेचा घरी जाऊन तिच्या मुलांसमोर अश्लील कृत्य करत विनयभंग केला होता. या प्रकरणी तत्काळ गुन्हा दाखल करून पोलीस उपनिरीक्षक रवींद्र मुदळ यांनी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. यानंतर त्याला अवघ्या ७२ तासांत शिवाजीनगर कोर्टाकडून १८ महिने कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
आरोपीविरोधात पुरावे सादर करून गुन्हा सिद्ध करण्यात आल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक रवींद्र मुदळ यांनी दिली. यावेळी न्यायालयाचे कामकाज न्यायदंडाधिकारी श्रद्धा जी. डोलारे यांनी पाहिले.
दरम्यान, 24 जानेवारी रोजी रात्री 10.30 वाजता पिडीत महिला घरी असताना आरोपी समीर जाधव याने मुलासमोर महिलेचा विनयभंग केला होता. ओळखीचा गैरफायदा घेऊन महिलेच्या घरात घुसून विनयभंग केला. पीडित महिलेने हिंजवडी पोलिसात तक्रार दिल्यानंतर अवघ्या 36 तासांत आरोपी समीरला पोलिसांनी बेड्या ठोकल्या.
दरम्यान, यानंतर न्यायालयात आरोपपत्र दाखल करत सरकारी वकील विजयसिंह जाधव यांच्यातर्फे मजबूत पुरावे न्यायालयात सादर केले गेले. दोन्हीकडील युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायदंडाधिकारी श्रद्धा डोलारे यांनी आरोपी समीर जाधवला कलम 354 अन्वये 6 महिने, कलम 452 अन्वये 6 महिने, कलम 506 अन्वये 6 महिने अशी सक्त मजुरीसह 9 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. तर, सदरची कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रवींद्र मुदळ यांनी केली.
