आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

अमरावती येथे सासूचा खून करुन फरारी आरोपीस अटक

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • January 30, 2022
Spread the love

विमानतळ पोलिसांची कारवाई : सासूरवाडीत जाऊन किरकोळ कारणातून केले कृत्य

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : जावई व पत्नीमध्ये सुरु असलेला वाद मिटवण्यासाठी मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या सासूवर कुऱ्हाडीने वार करुन खून केल्याची घटना शुक्रवारी (दि.28) दुपारी अमरावती जिल्ह्यात घडली होती. सासूचा खून करुन फरार झालेल्या आरोपी जावयाला पुण्यातील विमानतळ पोलिसांनी अटक केली. दिनेश भानुदास भोरखडे (वय-31, रा. पेठईतबारपुर पो. दर्यापुर जि. अमरावती) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यातील टाकरखेडा पूर्णा येथे आरोपी जावयाने सासरवाडीत येऊन सासू व पत्नीशी शुल्लक कारणावरून वाद घालून सासूवर कुऱ्हाडीने वार केले. यामध्ये सासू रुक्माबाई विनायक इंगळे (वय-45) या महिलेचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी पळून गेला.

विमानतळ पोलीस ठाण्यातील तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक अविनाश शेवाळे व पोलीस शिपाई नाना कर्चे यांना माहिती मिळाली की, अमरावती येथे सासूचा खून करुन फरार झालेला आरोपी दिनेश भोरखडे हा ट्रॅव्हल्स बसने येरवडा येथे येणार आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने सासूचा खून केल्याची कबुली दिली.

अमरावती ग्रामीण पोलिसांच्या पूर्णा पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीला पुढील कारवाईसाठी अमरावती पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अप्पर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग नामदेव चव्हाण, पोलीस उपायुक्त परिमंडळ-4 रोहीदास पवार, सहायक पोलीस आयुक्त किशोर जाधव यांच्या आदेशानुसार विमानतळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव, पोलीस निरीक्षक गुन्हे मंगेश जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अविनाश शेवाळे, गणेश साळुंके, पोलीस हवालदार रमेश लोहकरे, उमेश धेंडे, पोलीस नाईक सचिन जाधव, अंकुश जोगदंडे, रुपेश पिसाळ, विनोद महाजन, नाना कर्चे यांच्या पथकाने केली.