चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते लोकार्पण : पोलिसांच्या संकल्पनेतून नगरसेवकांनी बसविले सीसीटीव्ही
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे :गुन्हेगारीला आळा घालणे, गैरकृत्यावर नजर ठेवणे, सामाजिक शांतता अबाधित राखणे, वाहतूक अडथळ्यावर नियंत्रण ठेवणे, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, या अनुषंगाने महापालिकेच्या निधीतून डेक्कन पोलीस स्टेशन हद्दीमध्ये नगरसेवकांच्या सहकार्यामुळे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे आश्वासन दिले.
डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये बसविलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे लोकार्पण भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुरलीधर करपे, नगरसेविका नीलिमा खाडे, मंजुषा खर्डेकर, श्याम सातपुते, माजी विधानसभा विरोधी पक्षनेते, सरचिटणीस दत्तात्रय खाडे आदी मान्यवर उपस्थित होते.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शक सूचनाप्रमाणे डेक्कन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुरलीधर करपे यांनी प्रभाग क्र.१४च्या नगरसेविका नीलिमा खाडे यांच्यासोबत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी चर्चा केली. त्यानुसार ९० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असून, त्यानुसार गुन्हेगारी स्पॉट, गर्दीचे ठिकाण, महत्त्वाचे चौक, बसथांबे या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येत आहेत. कॅमेऱ्याचे मॉनेटरिंग प्रभात आणि बालगंधर्व पोलीस चौकीमध्ये असणार आहे, असे त्यांनी सांगितले.














