आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

‘थांब तुला खल्लास करतो’ म्हणत तरुणावर ‘बुछूट’ गोळीबार

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • February 8, 2022
Spread the love

बिबवेवाडी पोलिसांत फिर्याद : पूर्ववैमनस्यातून शिवशंकर सोसायटीतील प्रकार

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : काही दिवसांपूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून एका टोळक्याने तरुणावर दोन गोळ्या झाडून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील बिबवेवाडी येथे घडली आहे. तसेच या टोळक्याने हातात कोयते आणि लाकडी दांडके घेऊन परिसरात दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार बिबवेवाडी येथील शिव शंकर सोसायटीमध्ये शनिवारी (दि.6) रात्री 11 च्या सुमारास घडला.

अमित कैलास थोपटे (वय-32 रा. शिव शंकर सोसायटी, गल्ली क्र.2 बिबवेवाडी) याने फिर्याद दिली आहे. याप्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात सौरभ सरवदे, रुपेश सोनवणे उर्फ डिजे, निलेश सोनवणे, गणेश जगदाळे, बाबा बडबडे, अनिल कांबळे व त्यांचे इतर 5 ते 6 साथिदारांवर बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी आणि आरोपी यांच्यामध्ये शुक्रवारी (दि.4) वाघजाई मंदिर येथे भांडण झाले होते. शनिवारी रात्री 11 च्या सुमारास फिर्यादी हे त्यांचा भाऊ अमोल थोपटे, गणेश मोडावत व गल्लीतील इतर 4 ते 5 जण गप्पा मारत थांबले होते. त्यावेळी आरोपी वाघजाई मंदिर येथे झालेल्या भांडणाच्या कारणावरुन दुचाकीवरुन हातात कोयते आणि लाकडी दांडके घेऊन आले. आरोपींनी शिवीगाळ करुन ‘थांब तुला खल्लास करतो’ असे म्हणत पिस्टलमधून फिर्यादी यांच्या दिशेने दोन गोळ्या झाडून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच आरडा ओरडा करत परिसरात दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोन पितळी पुंगळ्या जप्त केल्या.