आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

बांधकाम व्यावसायिकाला 6.25 कोटींचा गंडा घालणारा जेरबंद

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • February 17, 2022
Spread the love

दिघी पोलिसांत पती-पत्नीविरोधात गुन्हा : बिगर तारखेच्या लेटरहेडवरून उघडले खाते

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : पुण्यातील एका बांधकाम व्यावसायिकाची सव्वा सहा कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी दिघी पोलिसांनी सोल सेलिंग एजंट पती पत्नीविरोधात गुन्हा दाखल करुन पतीला अटक केली. हा प्रकार 2014 ते डिसेंबर 2020 या कालावधीत स्टार सिटी गृहप्रकल्प, डुडुळगाव येथे घडला आहे.

समर्थ प्रॉपर्टीजच्या प्रोप्रायटर सुप्रिया सचिन थोरात, मॅनेजर सचिन हनुमंत थोरात (दोघे रा. रेलविहार कॉलनी, बिजलीनगर, आकुर्डी अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहे. याप्रकरणी कमल जयकिशन जेठाणी (वय-37 रा. सिंग सोसायटी, औंध, पुणे) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी कमल जेठाणी यांची आळंदी रोडवरील डुडुळगाव येथे स्टार सिटी नावाची बांधकाम साईट आहे. यातील ए, बी आणि सी विंगमधील फ्लॅट विक्री करण्याचे काम आरोपींना दिले आहे. त्यासंदर्भात सोल सेलिंग एजंटचा करारनामादेखील करण्यात आला आहे. त्यानुसार फ्लॅटच्या किमतीच्या सव्वा टक्के कमिशन आरोपींना देण्याचे ठरले होते.

मात्र आरोपींनी संगनमत करुन बुकिंग करणाऱ्या फ्लॅट धारकांकडून 27 लाख 80 हजार रुपये घेऊन त्याचा हिशोब फिर्यादी यांना न देता सोल सेलिंग करारनाम्याचा भंग केला. आरोपींनी फ्लॅट बुकिंगची रक्कम फिर्यादी यांच्या राजमाता कन्स्ट्रक्शनच्या बँक खात्यात जमा न करता प्रेरणा को ऑपरेटिव्ह बँकेच्या रावेत शाखेत जेठाणी यांच्या कंपनीचे बिगर तारखेचे लेटर पॅडवर संमतीपत्र तयार करुन खाते उघडले.

बनावट संमती पत्राच्या आधारे आरोपींनी प्रेरणा को ऑपरेटिव्ह बँकेत राजमाता कन्स्ट्रक्शनच्या नावाने दुसरे समांतर चालू खाते उघडले. फ्लॅट बुकिंगचे 5 कोटी 97 लाख 7 हजार 329 रुपये रक्कम त्या बनावट खात्यात जमा केली. तसेच हे पैसे चेक, ड्राफ्टद्वारे काढून घेतले. आरोपींनी फिर्यादी कमल जेठाणी यांची 6 कोटी 24 लाख 87 हजार 329 रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल भंडारे करीत आहेत.