आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

उघड्यावरील वीजेचा शॉक बसून ४ वर्षाच्या ‘शहजाद’चा मृत्यू

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • March 5, 2022
Spread the love

कोंढवा पोलिसांत ठेकेदार, महावितरणविरुद्ध गुन्हा : कोंढव्यातील मिठानगरमध्ये घडली घटना

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : अरेबिक भाषेच्या शिकवणीसाठी गेलेल्या एका चार वर्षाच्या मुलाचा उघड्यावरील वीजेच्या वायरला धक्का बसून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना मिठानगर (कोंढवा, पुणे) येथे बुधवारी (दि.2) घडली.

शहजाद अमीर सय्यद (वय ४, रा. नवाझिश पार्क, कोंढवा) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.

याप्रकरणी शहजाद याचे वडिल अमीर शौकत सय्यद यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी खोदकाम करणारे ठेकेदार, महावितरणचे अधिकारी, अभियंता तसेच वायरमन यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, शहजाद बुधवारी दुपारी अरेबिक भाषेच्या क्लाससाठी गेला होता. परंतु क्लासला सुट्टी असल्याने तो घरी येत होता. नवाझिश चौक ते कुबा मस्जिद रोडवर ड्रेनेजचे काम सुरु आहे. या कामासाठी रस्ता खोदण्यात आला होता. त्याच्या बाजूला फिडरचा पिलर होता. त्यामधील बाहेर आलेल्या काही वायरीपैकी एक वायर कट झाली होती. त्यामुळे ती खाली पडली होती. शहजाद हा त्या ठिकाणावरुन जात असताना त्याचा स्पर्श खाली पडलेल्या वायरीला झाला. शहजाद याला वीजेचा जोरदार धक्का बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

शहजाद याचे वडील अमीर सय्यद यांनी सांगितले की, पुणे महापालिकेच्या वतीने ड्रेनेजचे काम सुरु होते. त्यावेळी त्याठिकाणी उघड्यावर वायरी पडल्या होत्या. या ठिकाणी कोणीही नव्हते. तसेच कोणताही फलक लावण्यात आला नव्हता. अमीर सय्यद यांच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील यांनी सांगितले.