सिंहगड रोड पोलिस ठाण्यात फिर्याद : का पाहतो म्हणून वाद घालून शिवीगाळ
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : एकमेकांकडे पाहण्यावरुन पानटपरीची तोडफोड करीत चालकाला लोखंडी पाईपाने बेदम मारहाण करुन जखमी करणाऱ्या तिघांवर सिंहगड रोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. नऱ्हे येथील भुमकर चौकात रविवारी (दि.२७) रात्री साडे दहाच्या सुमारास ही घटना घडली.
विवेककुमार नन्नेलाल वर्मा (वय २१, रा. सिताई कॉर्नर, भुमकर चौक, नऱ्हे) असे जखमी झालेल्या पानटपरी चालकाचे नाव असून, त्याने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी भिम उर्फ भिमशा चव्हाण, व्यंकटेश पिनवलकर, किरण शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलीसांनी सांगितले की, आरोपी आणि फिर्यादी हे तोंडओळखीचे आहे. रविवारी रात्री फिर्यादी त्यांच्या मातोश्री पान शॉप मध्ये काम करत होते. त्यावेळी आरोपी त्याठिकाणी आले. भिमशा चव्हाण याने फिर्यादी यांना ‘तु माझ्याकडे असा का पाहतो’ असे म्हणत वाद घालून शिवीगाळ केली. तसेच लोखंडी पाईपने पानटपरीचे काऊंटर, शटर आणि एलईडी टिव्हीवर मारुन तोडफोड केली. तसेच फिर्यादी यांच्या डोक्यात लोखंडी पाईप मारुन जखमी केले. पुढील तपास पोलीस हवालदार गवळी करीत आहेत.



















