दहशतवादविरोधी पथकाची कारवाई : ११८ ग्रॅम वजनाचे १२ लाखांचे अंमली पदार्थ जप्त
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : मुंबईहून पुणे स्टेशन परिसरातील एका तस्करावर दहशतवाद विरोधी पथकाने कारवाई करून अटक केली. आरोपीकडून १२ लाख रुपयांचे ११८ ग्रॅम एम डी (मेफेड्रोन) जप्त करण्यात आले आहे. मोबाईल, डिजिटल वजन काटा, २ हजार ५९० रुपये रोख, आधारकार्ड, डेबीट कार्ड असे साहित्य जप्त करण्यात आले आहे. त्याच्या दोन साथीदारांचा शोध घेण्यात येत आहे.
महंमद फारुख महंमद उमर टाक (वय ४३, रा. म्हाडा कॉलनी, अंधेरी वेस्ट, मुंबई, मुळ रा. राजस्थान) असे अटक केलेल्या ड्रग्ज तस्कराचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार अशोक फारुख पेरणेकर यांनी दहशतवाद विरोधी पथकाच्या मुंबई पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
दहशतवाद विरोधी पथकाने सांगितले की, पुणे रेल्वे स्टेशनच्या परिसरातील मालधक्का चौकाकडून पुणे स्टेशनकडे जाणार्या रोडवरील फुटपाथवर एक जण अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार दहशतवाद विरोधी पथकाने घटनास्थळी धाव घेत सापळा रचून फुटपाथवर संशयास्पदरित्या रेंगाळणाऱ्याला अटक केली. त्याची झडती घेतली असता त्यांच्याकडे ११८ ग्रॅम एम डी सापडले.
पोलीस निरीक्षक विश्वास भास्कर अधिक तपास करीत आहेत.
