आरएमडी फाऊंडेशन कडून राबवला उपक्रम
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : शाळेचा गणवेश ही संकल्पनाच माहिती नसलेल्या मुलांना एकसारख्या ड्रेसमध्ये येण्यासाठी गणवेश हेच माध्यम आहे, त्यासाठी मुलांना मोफत गणवेश वाटप करण्याचा उपक्रम राबवला, अशी प्रतिक्रिया आर.एम.डी फाऊंडेशनच्या उपाध्यक्षा शोभा धारीवाल यांनी व्यक्त केली.
पालघर जिल्ह्यातल्या तलासरी तालुक्यातल्या उपलाट इथल्या तीर्थधान जिनशरणं इथे आयोजित गुरूपौर्णिमा कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या, तेव्हा बोलत होत्या.
पालघर जिल्ह्यातल्या दुर्गम भागातल्या आदिवासी अंगणवाडीत 650 हून अधिक मुलांना मोफत शालेय साहित्याचे ज्यामध्ये पाटी, पेन्सिल, गणवेश वाटप करण्यात आले. आर.एम.डी फाऊंडेशन कडून ही योजना राबवण्यात आली.
यावेळी जैन मुनि पुलकसागरजी महाराज उपस्थित होते. गुरूपौर्णिमेचे औचित्य साधत गणवेश देऊन मुलांना जो आनंद दिला, ती माझ्यासाठी मोठी भेट होती. एवढ्या मोठ्या प्रमाणात लहान मुले या मंचावर आली त्यामुळे व्यासपीठ अधिक सुंदर आणि भव्य झाल्याचे गौरवोद्गार पुलकसागजी महाराज यांनी काढले.
या प्रसंगी बालविकास अधिकारी गणेश माटे उपस्थित होते. गणवेशातून मुलांना एक शिस्त लागते असे मत तलासरी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक विजय मुतडक यांनी व्यक्त केले. तर अंगणवाडी सेविका गीता डबके यांनी गणवेश घातलेल्या मुलांच्या चेहऱ्यावर कुतुहल व आनंद दिसून येत असल्याचे मत व्यक्त केले.
गुरूपौर्णिमेचे औचित्य साधत या कार्यक्रमात सहभागी सर्व अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना चाफ्याची झाडे वितरीत करण्यात आली. तसेच उपस्थित सर्वांसाठी गौतमीप्रसादीचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात शासकीय अधिकारी, पोलिस अधिकारी, अंगणवाडी कर्मचारी, पर्यवेक्षिका, तसेच जैन समाजातील प्रतिष्ठित लोकांची उपस्थिती होते. उपलाट गावातला महिला वर्ग या कार्यक्रमाला आवर्जून हजर होता.
