एम. पी. डी. ए कायद्यान्वये 24 वी स्थानबद्धतेची कारवाई
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : शहरात खडक पोलिस स्टेशन हद्दीमधला अट्टल गुन्हेगार अरबाज उर्फ बबन शेख, वय 24 वर्षे, राहणार भवानी पेठ याच्यावर नागपूरमध्ये 1 वर्षाच्या स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. अरबाज शेख हा अभिलेखावरील सराईत गुन्हेगार आहे.
शेख आणि त्याच्या साथीदारांनी खडक, समर्थ, लष्कर पोलिस स्टेशन हद्दीत सुरा, पालघन, तलवार, कोयता हत्यारांसह खुनाचा प्रयत्न, खंडणी, जबरी चोरी, घरफोडी, दंगा, विनयभंग, बेकायदेशीर हत्यार बाळगणे आदी गंभीर स्वरूपाचे गुन्हे केले आहेत.
गेल्या पाच वर्षाच्या कालावधीत त्याच्याविरूद्ध 11 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्याच्या या कृत्यामुळे सदर परिसरातल्या सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा निर्माण झाली आहे. तसेच नागरिकांमध्ये दहशतही पसरली होती.
पुणे शहर पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी शेख विरूद्ध एमपीडीए कायद्यान्वये नागपूर मध्यवर्ती कारागृह इथे 1 वर्षासाठी स्थानबद्धतेची कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार खडक पोलिस स्टेशन चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील माने, पीसीबी गुन्हे शाखेच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक वैशाली चांदगुडे यांनी ही कारवाई केली.
पुणे शहर पोलिस आयुक्तांनी दहशत निर्माण करणाऱ्या सक्रीय अट्टल गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाई करण्याचे धोरण अवलंबले आहे. पोलिस आयुक्तांनी पदभार स्विकारल्यानंतरची ही 24 वी स्थानबद्धतेची कारवाई आहे.
