सायबर पोलिसांकडे फिर्याद : फोनवर आवाज येत नसल्याने चॅटिंग करून केला प्रकार
पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
व्हॉटसअॅपवरील डीपीवर चुलत भावाचा फोटो ठेवून त्याद्वारे कॉल करुन भारतातील मित्राला पैशाची गरज असल्याचे सांगून सायबर चोरट्यांनी तरुणाला 4 लाख रुपयांचा गंडा घातल्याचे समोर आले आहे.
याप्रकरणी पुणे विद्यापीठ कॉलनीत राहणार्या व्यक्तीने सायबर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी बँक खातेदार, तसेच व्हॉटसअॅप वापरकर्त्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी यांचा चुलत भाऊ अमेरिकेत राहतो. 12 जुलै रोजी त्यांना एक व्हॉटसअॅप कॉल आला. त्यावर त्यांचा चुलत भावाचा फोटो लावला होता. त्यामुळे आपल्या चुलत भावाचा कॉल असल्याचा त्याचा समज झाला. पण, कॉलवर आवाज व्यवस्थित येत नव्हता. त्यामुळे त्यांना तो आवाज ओळखता आला नाही. त्यानंतर सायबर चोरट्याने त्यांच्या भावाच्या नावाने चॅटींग सुरु केले. आपल्या भारतातील मित्राला वैद्यकीय कारणासाठी पैशाची गरज असल्याचे मेसेजवर सांगितले व त्यांना बँक खात्याची माहिती देऊन त्यावर 4 लाख रुपये ट्रान्सफर करायला सांगितले. त्यानुसार त्यांना आपल्या चुलत भाऊ सांगतो, असे वाटून त्यांनी दिलेल्या अकाऊंटवर 4 लाख रुपये ट्रान्सफर केले. त्यानंतर काही दिवसांनी त्यांचा चुलत भावाशी संपर्क झाल्यावर त्यांना आपली फसवणुक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी सायबर पोलिसांकडे फिर्याद दिली असून पोलीस निरीक्षक पाटील तपास करीत आहेत.
