दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाची कामगिरी : सव्वासहा लाखांचे बनावट पेपर ताब्यात
पुणे : महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क
बनावट इन्शुरन्स पॉलिसी पेपर तयार करणाऱ्यास दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक दोनकडून अटक करण्यात आली असून, एकूण सव्वासहा लाखांचे बनावट पेपर ताब्यात घेण्यात आले आहेत.
दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक २ गुन्हे शाखा, पुणे शहरचे पोलीस नाईक दत्तात्रय खरपुडे यांना त्यांचे गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, बजाज अलायन्झ जनरल इन्शुरन्स कंपनी लि. पुणे यांचे नावाचा लोगो व शिक्क्याचा वापर करून, बनावट इन्शुरन्स पॉलिसी पेपर तयार करुन एक इसम येरवडा व लोहगाव भागात ते बनावट पॉलिसीचे पेपर पियाजो, बजाज ऑटो रिक्षा, टुरीस्ट कार, टेम्पो व ट्रक अशा वाहनांचे मालकांना कमी पैशात बनावट इन्शुरन्स तयार करुन आर.टी.ओ. पासिंगसाठी देत आहे व तशी एक बनावट इन्शुरन्स पॉलिसीची प्रत प्राप्त झाल्याने सदर बजाज अलायन्झ जनरल इन्शुरन्स कंपनी लि. पुणे या कंपनीची फसवणूक होत असल्याची खात्री झाल्याने सदर कंपनीचे अधिकारी यांना संपर्क साधुन त्यांना वरील प्राप्त बनावट इन्शुरन्स पॉलिसीची प्रत दाखवुन ती बनावट असल्याची खातरजमा करुन त्याबाबत वरिष्ठ अधिकारी यांना माहिती देवून कारवाईच्या सुचना प्राप्त झाल्याने पथकाचे अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक विवेक पाडवी, पोलीस उपनिरीक्षक गंगा जगताप व इतर स्टाफ यांना सूचना व मार्गदर्शन केले.
त्याप्रमाणे बुधवारी (दि. ०१ सप्टेंबर) गांधीनगर, येरवडा, पुणे येथे एक इसम सदर बनावट इन्शुरन्स पॉलिसी पेपर्स घेऊन दुचाकीवरुन जाणार असल्याची बातमी समजल्याने पोलीस अधिकारी व स्टाफ तसेच बजाज इन्शुरन्स कंपनीचे अधिकारी यांच्यासह सदर बातमीचे ठिकाणी सायंकाळी सातच्या दरम्यान सदर दुचाकीस्वारास पकडले.
संतोष विठ्ठल शिंदे ( वय ४७, रा. गांधीनगर येरवडा पुणे) असे आरोपीचे नाव असून, त्याच्या कब्जात व त्याच्याजवळील दुचाकी गाडीचे डिक्कीत असे एकूण ३४ बजाज अलायन्झ जनरल इन्शुरन्स पॉलिसीचे एकूण ६,३२,९४२/- रु. चे बनावट पेपर मिळून आल्याने बजाज अलायन्झ जनरल इन्शुरन्स कंपनीचे संबंधित अधिकारी यांची फिर्याद घेऊन सदर इसमाविरुद्ध येरवडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात येऊन त्यास दाखल गुन्ह्यात अटक करून त्याची पोलीस कोठडीची रिमांड घेण्यात आली.
दरम्यान, सदर आरोपीच्या राहत्या घराची पंचासमक्ष घरझडती घेतली असता, त्याच्या घरामध्ये सदर बनावट इन्शुरन्स पॉलिसी पेपर तयार करण्याकरिता वापरात येणारे लॅपटॉप, प्रिन्टर, शिक्के, स्टॅम्प पॅड व कोरी कागदे इत्यादी ३२,५००/- रुपयाचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. सदर अटक आरोपी याने या कामाकरिता कोणाची मदत घेतलेली आहे, त्याबाबत तपास सुरू आहे, तसेच त्याने यापूर्वी किती लोकांना अशापद्धतीचे बनावट इन्शुरन्स पेपर वाटप केलेले आहे, याबाबत तपास सुरू आहे.
सदरची कारवाई ही पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) भाग्यश्री नवटके, पोलीस उपआयुक्त ( गुन्हे) श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पंधरकर, सहायक पोलीस निरीक्षक विवेक पाडवी, पोलीस उपनिरीक्षक गंगा जगताप आणि पोलीस अंमलदार उदय काळभोर, राजेश अभंगे, दिनकर लोखंडे, राजेश लोखंडे, विनायक रामाणे, गणेश लोखंडे, शिवाजी जाधव, दत्तात्रय खरपुडे, सुदेश सपकाळ व अमोल सरतापे यांनी केली आहे.
