होळकरवाडीतील घटना : डोक्यात दगड घालून केले जखमी
पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
घरातील गरीबीमुळे बिगारी काम करण्यासाठी मजुर अड्ड्यावर आलेल्या महिलेला गवत कापण्याचे काम देतो, असे म्हणून होळकरवाडीतील कानिफनाथ डोंगराजवळ नेऊन डोक्यात दगड घालून जखमी केले. चाकूचा धाकाने अंगावरील १६ हजार रुपयांचे दागिने जबरदस्तीने लुबाडून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी कोंढव्यातील एका 45 वर्षाच्या महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही महिला बिगारी काम करण्यासाठी मजुर अड्ड्यावर बुधवारी सकाळी उभ्या होत्या. यावेळी एक साधारण 30 वर्षाच्या भामटा त्यांच्याकडे आला. त्याने फिर्यादी महिलेसोबत कामाची मजुरी ठरवून गवत कापण्याकरीता तिला तो होळकरवाडी येथील कानिफनाथ डोंगराजवळील कोणार्क पुरम सोसायटीसमोर आणले. तेथे त्याने फिर्यादीच्या डोक्यात दगड मारुन जखमी केले. चाकूचा धाक दाखवला. तेव्हा फिर्यादीने हात झटकला असता त्याने त्यांच्या गळ्याला चाकू लावला. त्यांच्याकडील सोन्याच्या कानातील दोन वेल आणि चांदींच्या पट्ट्या असा 61 हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने काढून घेतला. त्यांना जखमी अवस्थेत तेथेच सोडून तो पळून गेला.
कोंढवा पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक दीपक बर्गे अधिक तपास करीत आहेत.
